

कन्नड: शहरातील शिवनगर भागात राहणाऱ्या तौफिक शेख सिद्दीक यांना रविवारी (दि. १४) सायंकाळी अपघाती दुखापत झाली. सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते सावित्रीबाई फुले कन्या शाळेकडून जात असताना अचानक समोरून उडणाऱ्या पतंगाचा मांजा त्यांच्या मानेजवळ आला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी हाताने मांजा बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीक्ष्ण नायलॉन मांज्यामुळे त्यांच्या हातावरील चार बोटांना गंभीर इजा झाली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जखमी अवस्थेत तौफिक यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवले.
शहरातील शिवनगर येथील एका घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दि. १० रोजी सायंकाळी छापा टाकून ७,६४० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला होता.
तसेच, शहरातील पाढरी मोहल्ला येथील एका किराणा दुकानात नायलॉन मांज्याची विक्री होत असल्याची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांनी शनिवारी दी. १३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून २,७२० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला होता. तरी सुद्धा नायलॉन मांज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांमुळे गंभीर अपघात घडत असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, प्रशासनाने नायलॉन मांज्याविरोधात अधिक कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.