

कन्नड : शेतीच्या व्यवहारासाठी कन्नड येथून गोराडखेडे (ता. पाचोरा) येथे गेलेले डॉ. संजय मनोहर तेली (५३, सांगवी प्र. लो., ता. पाचोरा, ह. मु कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. शेतीच्या व्यवहारातील वादातून शेतमालक व त्याचा नोकर यांनी डॉक्टरचा खून करून मृतदेह गोणपाटात बांधून बहुळा धरणात फेकल्याची कबुली त्यांनी दिली.
शेतकरी राहुल धर्मराज पाटील (४४) आणि त्याचा नोकर संजय वामन भिल (५५, दोघे गोराडखेडे खुर्द, जि. जळगाव, ता. पाचोरा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. डॉ. संजय तेली हे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शेतीच्या व्यवहारासाठी १ लाख ९० हजार रुपये रोख घेऊन गोराडखेडे येथील शेतात आले होते.
दुपारी २:४५ वाजेनंतर त्यांचा मोबाईल बंद झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यांचे चारचाकी वाहन महामार्गावर आढळले. तर वाहनाची चावी जवळच असलेल्या रसवंती दुकानावर ठेवलेली होती.
दरम्यान, रविवारी (दि.२२) सायंकाळी सात वाजता आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह गोणपाटात बांधून बहुळा धरणात फेकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने धरणात रात्री शोधमोहीम सुरू केली होती. मृतदेह सापडल्या नंतर सोमवारी (दि.२३) त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.डॉ. संजय तेली यांचे कन्नड शहरात गेल्या ३० वर्षांपासून वास्तव्यास होते यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार मोठा आहे.
शेतमालकावर संशय बळावला आणि..
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप पाटील आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान शेतमालक राहुल पाटील आणि त्याचा नोकर संजय भिल यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चौथ्या दिवशी दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.