

राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीने उग्र रूप धारण केले आहे. पाऊसाअभावी पिके करपून खाक झाली.आता थेंब-थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांना प्यायला पाणी उरलेले नाही. शहरांमध्येही आठ-दहा दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर कपातीचे संकट घोंघावत आहे. अशी विदारक परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र निव्वळ ‘हौस’ म्हणून वाहने चकाकण्यासाठी मराठवाड्यात रोज सुमारे २ कोटी २० लाख लिटरपेक्षा जास्त पाण्याची अमानुष नासाडी सुरू असल्याचे संतापजनक चित्र आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सुमारे १० ते १२ हजार वॉशिंग सेंटर्स सुरू आहेत. शहरातील अनेक भागात रस्त्या-रस्त्यांवर अगदी गल्लीबोळातही वॉशिंग सेंटर सुरू आहे. एका वॉशिंग सेंटरवर रोज साधारण १५ दुचाकी आणि ५ पेक्षा अधिक चारचाकी गाड्या धुतल्या जातात. अनेक ठिकाणी नळाला थेट पाइप लावून किंवा प्रेशर पंपाव्दारे पाण्याचा बेसुमार मारा करुन गाड्या धुतल्या जातात. ज्यामुळे पाण्याची नासाडी अधिक होते.
याशिवाय विविध वाहनांचे शेकडो शोरुम्स, सर्व्हींस सेंटर, लहान-मोठे हजारो गॅरेज आणि घराघरांत दररोज धुतल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वेगळीच आहे. बहुतांश ठिकाणी हे पाणी जमिनीच्या पोटातून बोअरवेलद्वारे बेसुमार उपसले जाते. या भीषण दुष्काळी परिस्थितीत आपली दुचाकी, चारचाकी गाड्या चकाचक ठेवण्याच्या नादात लाखो लिटर पिण्यायोग्य पाणी वाया जात आहे. पाण्याचा हा अपव्यय असाच सुरू राहिला, तर येत्या दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.
वाहने धुण्यासाठी चक्क वेटिंग
संपूर्ण मराठवाडा दुष्काळाची झळ सोसत असताना बहुतांश वॉशिंग सेंटरवर गाड्या धुण्यासाठी गर्दी दिसून येते. नुकतेच दसरा-दिवाळीत अनेक ठिकाणी वॉशिंगसाठी तासनतास वेटिंग करावी लागल्याचे चित्र होते.
पाण्यासाठी जनावरांचा टाहो
ग्रामीण भागात पिण्यासाठी अन् चाऱ्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी आपली जिवापाड जपलेली जनावरे विकत आहे. तर कित्येक ठिकाणी जनावरांना मोकाट सोडून देण्याची विदारक वेळ आली आहे.
एका दुचाकीला ५०, तर चारचाकीसाठी लागते २०० लिटर पाणी
याबाबत विविध वॉशिंग सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनूसार,प्रेशरच्या माध्यमातून एक दुचाकी धुण्यासाठी ४० ते ५० लिटर पाणी लागते. तर एका कारसाठी सुमारे २०० लिटर पाणी फुकट घालवले जाते. प्रत्येक वॉशिंग सेंटरवर रोज सरासरी १५ दुचाकी आणि ५ चारचाकी वाहने धुतली जातात. यानूसार एका वॉशिंग सेंटरवर रोज तब्बल २ हजारहून अधिक लिटर पाणी गटारातून वाहून जाते.
आठवड्यातून एकदा किंवा गरज असेल तेव्हा ओल्या कपड्याने पुसून गाडी स्वच्छ करावी. वॉशिंग सेंटर चालकांनीही पाण्याचा पुर्नवापर करावा किंवा मर्यादित वापर करावा. आज वाचवलेला पाण्याचा एक थेंब उद्या कोणाची तरी तहान भागवेल! या विचारातून पाण्याची नासाडी थांबवावी.
सय्यद चॉंदभाई, संस्थापक, टू व्हिलर मॅकेनिक असोसिएशन.