

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडीतून धुळे-सोलापूर महामार्गाकडे जाणाऱ्या शहर विकास आराखड्यातील (डीपी) मंजूर २४ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी शनिवारी (दि. १४) महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई केली. यावेळी विनापरवाना बांधलेली ३८ पक्की व कच्ची बांधकामे आणि इतर अशी एकूण ६३ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे २ किलोमीटर अंतरातील रस्ता कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर महापालिकेने विशेष भर दिला आहे. त्यासाठी विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. पैठण रस्त्यावरील कांचनवाडी ते धुळे-सोलापूर महामार्गाकडे जाणाऱ्या या रस्त्यासाठी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून मागणी होत होती.
महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत बाधित मालमत्ताधारकांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, मालमत्ताधारकांनी स्वतः हून बांधकामे न हटवल्याने अखेर शनिवारी अतिक्रमण हटाव पथकाने कारवाईचा बडागा उगारला.
सकाळी १० वाजता मोहिमेला सुरुवात झाली. दिवसभरात पक्की घरे, टपऱ्या आणि इतर बांधकामे पाडण्यात आली. महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार, अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
यावेळी उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त अर्चना राजपूत, पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, संजय सुरडकर, इमारत निरीक्षक मुकेश खडसे, विनोद देसाई, नगररचना विभागाचे शिवाजी लोखंडे आणि नागरी मित्र पथकाचे माजी सैनिक उपस्थित होते.
या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाची निविदा आधीच मंजूर झाली आहे. मात्र, बांधकामांमुळे काम सुरू करण्यात अडचणी येत होत्या. आता अडथळे दूर झाल्याने पुढील आठ दिवसांत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
१०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा
या मोहिमेसाठी ६ जेसीबी, २ टिप्पर आणि इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहनांसह महापालिकेचे ६० अधिकारी-कर्मचारी आणि सातारा ठाण्याचे ४० पोलिस कर्मचारी असा एकूण १०० जणांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
अनेकांचे संसार रस्त्यावर
या रस्त्याच्या जागेवर अनेक वर्षांपासून काही नागरिक पक्की तर काही कच्ची घरे बांधून राहत होते. महापालिकेच्या कारवाईमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. डोळ्यांदेखत राहते घर पाडल्याने महिलांना अश्रू अनावर झाले होते.