

Junior colleges will be deserted, 1.25 lakh seats will remain vacant in five districts
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांत यंदा इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तब्बल १ लाख २० हजार जागा रिक्त रा हणार आहेत. या पाच जिल्ह्यांत एकूण १३४३ महाविद्यालये असून, त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता २ लाख ६६ हजार ७५० इतकी आहे. परंतु प्रत्यक्षात ऑनलाईन पद्धतीने केवळ १ लाख ४० हजार ६७विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे असंख्य महाविद्यालये विद्याथ्यांविना राहणार आहेत.
यंदा राज्यात सर्वत्र इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. २६ मेपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. त्यात विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० महाविद्यालयांचे पर्याय देण्याची मुभा देण्यात आली होती. यात छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण १ लाख ४० हजार ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली पाच जिल्हो येतात. या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १३४३ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांची एकत्रित प्रवेश क्षमता ही २ लाख ६६ हजार ७५० इतकी आहे. यामध्ये कला शाखेची १ लाख ११ हजार १६५, वाणिज्य शाखेची ४२ हजार ६१५ आणि विज्ञान शाखेची १ लाख १२ हजार ६७० इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे विभागात तब्बल १ लाख २० हजार जागा रिक्त राहणार असल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना पुरेसे विद्यार्थी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत सापडले आहेत.
गतवर्षीपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच विभागांतील अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात होती. तर मराठवाड्यात पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरच प्रवेश देण्यात येत होते. मात्र येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वत्रच अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे.