

JSW to manufacture electric cars in Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जेएसडब्ल्यू कंपनी संभाजीनगरातील बिडकीन (ऑरिक) येथे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ५५० एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी जेएसडब्ल्यूने चीनच्या नावाज-लेल्या चेरी ऑटोमोबाईल कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी केली आहे. करारानुसार चेरीकडून ईव्हीसाठी आवश्यक तंत्रज्ञान व महत्त्वाचे घटक पुरवले जाणार आहेत.
ही भागीदारी केवळ तांत्रिक पुरवठ्यापुरती मर्यादित असणार असून, चीनकडून थेट इक्विटी स्वरूपात कोणतीही गुंतवणूक केली जाणार नाही. यामागे भारत सरकारचे सामरिक क्षेत्रांतील परकीय गुंतवणूक धोरण कारणीभूत आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी जेएसडब्ल्यू कडून चेरीला ठराविक रक्कम शुल्क म्हणून दिले जाईल. भविष्यात रॉयल्टी स्वरूपातही भरपाई केली जाईल.
जेएसडब्ल्यू या उपक्रमात भारतीय कौशल्यावर भर देणार असून, केपीआईटी टेक्नोलॉजी व एलटीआईमाइंडट्री यासारख्या देशांतर्गत कंपन्यांच्या सहकार्याने कोर ईव्ही तंत्रज्ञान विकसित केले जाणार.
२०२६ पासून व्यावसायिक वाहने (ट्रक व बस) उत्पादनात येणार, २०२७ पासून प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू होणार मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळणार
ऑरिक येथे उभारण्यात येणाऱ्या उत्पादन प्रकल्पातून जेएसडब्ल्यू आपली नवीन ईव्ही वाहने तयार करणार आहेत. ही भागीदारी आणि उत्पादन योजनेमुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगात नवचैतन्य येण्याची शक्यता आहे. खास करून स्थानिक उत्पादनावर भर दिल्याने मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळेल, असे उद्योगतज्ज्ञांचे मत आहे.