

छत्रपती संभाजीनगर- संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या मे महिन्यातील उपोषण आंदोलनानंतर मराठवाड्यात मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी प्रमाणपत्रे वाटपाला गती मिळाली आहे. केवळ दीड महिन्यातच प्रशासनाला प्राप्त झालेल्या १० हजार ८१ अर्जापैकी ९ हजार ९३२ उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रमाणपत्र वाटपासाठी नियुक्त समितीच्या २७ जुलै २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालात नमूद आहे. तर आतापर्यंत मराठवाड्यात ३ लाख ११ हजार ३३ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे वितरित केली आहेत. यात सर्वाधिक २ लाख ६ हजार प्रमाणपत्र बीड जिल्ह्यातील आहेत.
मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपात दिरंगाई केली जात असल्याची ओरड सुरू झाली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी भर उन्हाळ्यात आदोलनाला सुरुवात केली होती, परंतु उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटी येथे भेट देऊन मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भातील मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन जरांगे यांना दिले होते. त्यावरून त्यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. या आंदोलनानंतर विभागात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला गती मिळाली आहे.
उपोषणानंतर १० हजार ८१ अर्ज प्राप्त झाले, त्यातील ९ हजार ९३२ जणांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहेत. दरम्यान, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी दाखल्यासाठी आतापर्यंत ३ लाख ११ हजार ६०९ अर्ज दाखल झाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ हजार २११ प्रमाणपत्रे वितरित केले आहेत. जालन्यात १८ हजार ५३, परभणीत २० हजार ८३२ दाखल्याचे वाटप झाले, हिंगोलीमध्ये १३ हजार २८६, नांदेड जिल्ह्यात ४ हजार ८३०, बीडमध्ये २ लाख ६ हजार ७८९ प्रमाणपत्रांचे वाटप झाले, तर लातूर जिल्ह्यात २ हजार ७५१ दाखले वितरित झाले. धाराशिवमध्ये १९ हजार २८१ दाखल्याचे वाटप झाल्याचे सूत्रांनी नमूद केले. सप्टेंबर २०२५ पासून आतापर्यंत विभागात ७२ हजार १२ प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे अहवालात नमूद आहे.