

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगावच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. सावकारीचा परवाना (लायसन्स) मंजूर करून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि सहकार अधिकारी (श्रेणी-२) सतीश शेरखाने यांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे माजलगावसह संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, सहकार विभागातील कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने सावकारी व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी सहायक निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. संबंधित परवाना मंजूर करून देण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून १३ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने संबंधित नागरिकाने जालना एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची गोपनीय पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची खात्री झाली. त्यानंतर मंगळवारी नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला.
तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे सहायक निबंधक कार्यालयात जाऊन १३ हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाड टाकत सहायक निबंधक सुरज जगदाळे आणि सहकार अधिकारी सतीश शेरखाने यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर सहायक निबंधक कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करून पंचनामा केला. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचेच्या व्यवहारामागील इतर बाबींचाही तपास केला जात आहे. माजलगाव तालुक्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरीच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना साधे प्रशासकीय काम करून घेण्यासाठीही पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. सावकारी परवान्यासारख्या कायदेशीर प्रक्रियेसाठीही लाचेची मागणी झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी माजलगाव नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना तब्बल पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. त्यानंतर आता सहकार विभागातील दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने माजलगावमधील शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.