

Kannad Taluka Molestation
पिशोर : कन्नड तालुक्यातील पिंपरखेडा येथे एका २२ वर्षीय तरुणीला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मोटारसायकलवर बसवून प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, पिशोर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रदीप कैलास सोनवणे (रा. पिंपरखेडा, ता. कन्नड) याने पीडित तरुणीला "तुझे फोटो व्हायरल करतो" अशी धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव निर्माण केला. त्यानंतर तिला मोटारसायकलवर बसवून पिंपरखेडा ते वासडी या मार्गावर नेत असताना विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून २९ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार परमेश्वर दराडे करीत असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.