Marathwada Kunbi Certificates |मराठवाड्यात ३ लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण

बीड जिल्हा आघाडीवर, न्या. शिंदे समितीने घेतला आढावा
मराठवाड्यात ३ लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण
मराठवाड्यात ३ लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वितरणAI PHOTO
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी, कुणबी- मराठा व कुणबी दाखल्यांच्या वाटपासाठी नियुक्त समितीच्या २९ जून २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण ३ लाख ४ हजार ६४१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ३ लाख ४ हजार ५१ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर ४३० अर्ज नामंजूर करण्यात आले असून, १६० अर्ज प्रलंबित आहेत.

मराठा कुणबी आरक्षणप्रश्नी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने मंगळवारी (दि.३०) मराठवाड्यातील मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ही आढावा बैठक झाली. बैठकीला प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा जी. सी., अप्पर विभागीय जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मराठवाड्यात आतापर्यंत वितरित मराठा कुणबी प्रमाणपत्रांची माहिती देण्यात आली. त्यानुसार, बीड जिल्हयात सर्वाधिक २ लाख ४ हजार २५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ लाख ३ हजार ९८८ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून, केवळ २७ अर्ज प्रलंबित आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ हजार ४९५ अर्जापैकी २४ हजार ४३१ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून, एकही अर्ज प्रलंबित नाही. जालना येथे ५३, परभणी येथे ३८ आणि धाराशिव येथे ४२ अर्ज प्रलंबित आहेत. धाराशिवमध्ये २४५ अर्ज नामंजूर झाले आहेत. दरम्यान, १ सप्टेंबर २०२५ ते २९ जून २०२६ या कालावधीत मराठवाड्यात एकूण ६५ हजार ३० कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये बीड (४०,८६५) जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक असून त्यानंतर परभणी (५,५७८), धाराशिव (५,०१९), छत्रपती संभाजीनगर (४,७७७) आणि हिंगोली (४,१८९) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

प्रलंबित अर्जाचा दोन आठवड्यांत निपटारा

मराठवाड्यात मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरणाचे काम वेगाने करण्याच्या सूचना समितीने दिल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्जाची संख्या जास्त आहे. त्यांना दोन आठवड्यांत प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा जी. सी. यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news