

Investigation Mylan Pharma case Waluj MIDC
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वाळूज एमआयडीसीतील मायलान फार्मा कंपनीच्या वैद्यकीय कचऱ्यातून एमडी (मेथेड्रोन) या प्रतिबंधित अमली पदार्थांसाठी वापरली जाणारी गोळ्यांची पावडर बाहेर पडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून शनिवारी (२८ जून) गुन्हे शाखेच्या पथकाने कंपनीचे प्लांट हेड, प्रोडक्शन मॅनेजर, तसेच उत्पादन विभागाशी संबंधित एकूण आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली.
सकाळी १० वाजता सुरू झालेली ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी सुमारे एक ते दीड तास झाली. गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र काय आहे, कोणाचा अधिपत्याखाली कोणता विभाग आहे, याची प्राथमिक माहिती घेतली गेली आहे.
चौकशीतून कोणत्या विभागातून त्रुटी झाली, हे निष्पन्न झाल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान काही अधिकाऱ्यांकडून अजून काही महत्त्वाची माहिती मिळणं बाकी आहे. त्यामुळे गरज भासल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल. तसेच, कंपनीतील आणखी दोन ते तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.