

Mylan Pharma inquiry in Sand drugs case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज एमआयडीसीमधील मायलान फार्मा कंपनीतील भंगाराचे कंत्राट घेतलेला मुख्य आरोपी बबन खानला तेथून ड्रग्ससाठी गोळ्यांची पावडर पुरविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोलिस चौकशी करणार आहेत. तसेच अन्य औषध निर्मिती कंपन्यातीलही कोण या रॅकेटमध्ये सहभागी आहे याचा तपास केला जाणार आहे.
मायलान कंपनीतील कचऱ्यातून ही पावडर खानच्या गोदामात येत होती. तेथून खान परराज्यासह विदेशातील ड्रग्स तस्करांकडे पुरवठा करत होता. दरम्यान, खानने क्रिप्टो करन्सीमधून अनेक व्यवहार केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी बुधवारी (दि. २५) न्यायालयात दिली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता मुख्य आरोपी बबन खान नजीर खान (६५), त्याची दोन मुले कलीम खान बबन खान (४१), सलीम खान बबन खान (३५, तिघेही रा. जुना बाजार), वाहन चालक शफीफुल रहेमान तफज्जुल हुसेन (४५) आणि राज रामतिरथ अजुरे (३८, दोघेही रा. उत्तरप्रदेश) या पाचही आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
फार्मा कंपन्यांमधून कचऱ्यात निघणाऱ्या गोळ्यांच्या पावडरपासून एमडी ड्रग्सचा धंदा करणाऱ्या भंगार खानसह त्याच्या दोन मुलांना आणि दोन चालकांना एनडीपीएसच्या पथकाने २१ ते २३ जूनदरम्यान साजापूर चौफुली रस्त्यावरील गोदामात छापा मारून अटक केली. या कारवाईत २ किलो ४७३ ग्रॅम एमडी पावडर, दोन टेम्पो असा १ कोटी ४३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीना बुधवारी एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि त्याच्या पथकाने न्यायालयात हजर केले. यावेळी बागवडे आणि सरकारी वकील सुधीर बनसोडे यांनी मुख्य आरोपी बबन खान हा पूर्वी मुंबईच्या गोरेगाव भागात राहत होता.
त्याच्याकडे विविध औद्योगिक कंपन्यांचे भंगाराचे कंत्राट होते. त्यानंतर त्याला २००० साली छत्रपती संभाजीनगर येथे एमआयडीसी वाळूज भागातील कंपन्यांकडून कंत्राट मिळाल्याने तो येथेच स्थायिक झाला. त्याच्याकडे २०११ पासून मायलान फार्मा कंपनीचे भंगार उचलण्याचे कंत्राट आहे. मायलान कंपनी ही एड्स, कॅन्सर अशा गंभीर आजारा-वरील औषधी, गोळ्या निर्मिती करते. या कंपन्यांना रसायन बाहेर देता येत नाही. मात्र, खान याच्या गोदामात छापा मारल्यानंतर तिथे कंपनीमधून आलेल्या कॅरीबॅगमध्ये गोळ्यांची पावडर असल्याचे उघड झाले.