

IndiGo flight services disrupted Waiting times have also increased in trains.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा इंडिगोची विमान सेवा विस्कळीत झाल्याने विमान प्रवासी अचानक इतर पर्याय शोधत आहेत. अनेकांनी रेल्वेकडे धाव घेतली, परंतु अगोदरच फुल्ल असलेल्या रेल्वेत त्यांना मिळत नाही, परंतु वेटिंगचा आकडा मात्र वाढला आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबई, हैदराबाद, दिल्ली जाणारी इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली आहे. विमान प्रवाशांना ऐनवेळी विमान रद्द झाल्याची माहिती दिली जात असल्याने त्या प्रवाशांना पर्याय शोधण्याची वेळ येत आहे. अनेकांनी टॅक्सीकडे धाव घेतली तर काही प्रवाशांनी रेल्वे व स्वतःच्या वाहनांचा पर्याय निवडला. रेल्वेचा पर्याय निवडलेल्या प्रवाशांना मात्र निराश होण्याची वेळ आली आहे. आगोदरच मुंबई दिल्ली मार्गावरील फुल्ल असलेल्या रेल्वेत वेटिंग सुरू आहे. ऐनवेळी धाव घेतलेल्या विमान प्रवाशांमुळे वेटिंगच्या संख्येत वाढ झाली आहे.
अलीकडेच १० ते १२ वेटिंग असलेली संख्या वाढून ३० ते ४० वर गेली आहे. मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे फुल्ल मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेला अनेक दिवसांपासून वेटिंग सुरू आहे. विमानसेवा विस्कळीत झाल्याने रेल्वेकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेच्या वेटिंग संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या मार्गावरील रेल्वेंना २८ ते ७४ पर्यंत वेटिंगचा आकडा वाढला आहे. ही स्थिती येणाऱ्या आठ दिवसांची आहे. आणखी प्रवासी वाढले तर याचा कालावधी आणि वेटिंगची संख्या आणखी वाढण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवासी वाढण्याची शक्यता
नुकतेच इंडिगोने बेंगळूरू, मुंबई आणि हैदराबार विमानसेवा काही मार्गावर ८ ते १५ आणि काही मार्गावर १५ ते ३१ अशी रद्द केल्याने हे प्रवासी आजपासूनच रेल्वेच्या बुकिंगचा प्रयत्न करत आहेत. तात्काळसाठी अचानक गर्दी वाढल्याने नियमित रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.