

Incident in Aurangpura; case of attempted murder registered at Kranti Chowk Police Station.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बहिणीशी बोलत असल्याच्या जुन्या वादातून तडजोड करण्याच्या बहाण्याने बोलावून एका तरुणाच्या पाठीत चाकू भोसकून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना औरंगपुरा परिसरातील शिवसेना भवनालगत असलेल्या पुस्तकालयाच्या पार्किंगमध्ये मंगळवारी (दि. २९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी तरुणावर घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दिनेश राजू खरात (२६, रा. सुरडकर यांच्या घरात, किलेअर्क) असे या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी दिनेशचा लहान भाऊ पवन राजू खरात (२१) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पवन आणि त्याचा भाऊ दिनेश हे पूर्वी हसूल येथील अंबरहिल परिसरात राहत होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोरच आरोपी अल्पवयीन मुलगा हा कुटुंबासह राहत होता. आरोपीची बहीण आणि दिनेश खरात हे दोघे एकमेकांशी बोलत असत. यावरून दिनेश आरोपीमध्ये नेहमी वाद व्हायचे.
या वादामुळेच खरात कुटुंबाने घर बदलून किलेअर्क परिसरात राहायला गेले होते, तरीही दिनेश आणि आरोपीच्या बहिणीचा संपर्क होता. मंगळवारी (दि. २९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दिनेशने त्याचा भाऊ पवन याला फोन करून सांगितले की, आरोपीसोबत भांडण झाले असून कॉम्प्रोमाईज करण्यासाठी औरंगपुरा येथे ये. त्यानुसार पवन आणि त्याचा नातेवाईक तिथे गेले. त्यानंतर दिनेशने त्यांन शिवसेना भवनसमोरील पुस्तकालयाच्या पार्किंगमध्ये बोलावले. तिथे आरोपी अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन-तीन मित्र उभे होते.
एकट्याला बोलायचे आहे सांगून घातला घाव
थोड्या वेळाने दिनेशही दुचाकीवर तिथे पोहोचला. आरोपीने दिनेशला माझ्या बहिणीबाबत एकट्याला बोलायचे आहे असे सांगून बाजूला नेले आणि बोलत असतानाच अचानक चाकू काढून दिनेशच्या पाठीत उजव्या बाजूला खोलवर वार केला. या हल्ल्यामुळे घाबरलेला दिनेश जीव वाचवण्यासाठी औरंगपुरा पोलिस चौकीच्या दिशेने पळाला. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. रक्तबंबाळ दिनेशला फिर्यादीने घाटीत नेले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे हे करत आहेत.