

In wards 23, 24, and 25, 55 candidates withdrew their nominations.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:
महापालिकेच्या २३, २४ आणि २५ क्रमांकाच्या प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शुक्रवार (दि.२) हा शेवटचा दिवस होता. या तीन प्रभागांतून एकूण ५५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर माघारीनंतर ९८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले. या तीन प्रभागांत एकूण १५३ उमेदवारांनी २०३ अर्ज दाखल केले होते. यावेळी उमेदारांची मोठी धावपळ उडाल्याचे दिसून आले.
याप्रसंगी सिडको कार्यालाजवळील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत वातावरण शांत होते. मात्र दुपारनंतर अचानक उमेदवार, समर्थक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची गर्दी वाढली आणि परिसरात प्रचंड धावपळ सुरू झाली.
मोठ्या पक्षांच्या दिग्गज उमेदवारांकडून बहुतांश अपक्ष उमेदवार तसेच स्वपक्षीय बंडखोरांची मनधरणी करण्यात येत होती. बंडखोर उमेदवारांना या कमिटीवर घेऊ, त्या कमिटीवर घेऊ, पक्षात यापेक्षा मोठी जबाबदारी देऊ, अशी आश्वासने दिली जात होती. तर अपक्ष उमेदवारांना यावेळी आम्हाला मदत करा, पुढील निवडणुकीत आम्ही तुमचा झेंडा हाती घेऊ, असे सांगण्यात येत होते.
दरम्यान, पक्षातील काही बंडखोर उमेदवारांनी माघार अर्जावर सही करण्यापर्यंत कलगीतुरा सुरू ठेवला. अखेर दुपारी तीनच्या ठोक्याला अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला. तरीही काही उमेदवारांना अद्याप बंडखोर व अपक्ष उमेदवारांमुळे डोकेदुखीचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांच्यासह सहाय्यक अधिकारी सारिका 'भगत, श्रीकांत देशपांडे, मधुकर चौधरी आणि प्रशांत काळे यांनी कामकाज पाहिले.
एका राष्ट्रवादीसाठी दुसऱ्या राष्ट्रवादीची माघार
प्रभाग क्रमांक २३ (ब) मधील शरद पवार गटाचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत अजित पवार गटाचे उमेदवार दत्ता भांगे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. समविचारी पक्ष असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान होऊ नये, या भूमिकेतून हा निर्णय घेतल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.