

The Pudhari Talent Search initiative provides a boost to improving educational quality.
छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणवत्तेला वाव देत त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी पुढारी टॅलेंट सर्च हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस निश्चितच चालना मिळणार असल्याचे मत आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्पाधिकारी चेतना मोरे यांनी व्यक्त केले.
आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पातंर्गत इयत्ता चौथी, पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि विश्लेषणात्मक कौशल्ये ओळखण्यास मदत होणार आहे. या उपक्रमातून हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन तसेच भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारीची दिशा मिळणार आहे.
विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ताधारित उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून पुढारी टॅलेंट सर्च सारखे उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना उज्ज्वल भवितव्याकडे नेणारे ठरतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) भागवत कदम सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) उद्धव वायाळ, साधना अंभोरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शेवाळे, दैनिक पुढारीचे युनिट हेड अमोल कोल्हे, जाहिरात व्यवस्थापक अप्पासाहेब गोरे, राजेंद्र महाजन, अशोक विखे उपस्थित होते. यावेळी प्रा. संतोष वीरकर यांनी शिक्षकांना परीक्षा घेण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग्य मार्गदर्शनातूनच परिपूर्ण विद्यार्थी: प्रा. वीरकर
विद्यार्थी घडवताना शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून योग्य दिशा, प्रेरणा आणि मूल्याधारित शिक्षण दिल्यास विद्यार्थी परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवू शकतो, असे मत प्रा. संतोष वीरकर यांनी आदिवाशी शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या प्रशिक्षण प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही अनेक विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससी सारख्या अवघड परीक्षा यशस्वीरीत्या पार करत आहेत, यामागे शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी केवळ पाठांतरावर भर न देता समजून घेण्यावर आधारित म्हणजेच बाय हार्ट शिक्षण पद्धतीने अध्यापन केल्यास विद्यार्थी कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहजपणे पार करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला ओळखून त्यांना आत्मविश्वास देणे, हेच खरे शिक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.