

In the Zilla Parishad elections, Mysore ink will be used to mark the finger
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोग २०१० पासून मतदानावेळी मार्कर पेनची शाई वापरत आहे. परंतु यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे म्हैसूर शाईचा वापर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शनिवारी सांगितले.
विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शनिवारी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव सूर्या कृष्णमूर्ती, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनय राठोड, परभणीचे पोलिस अधीक्षक वीरेंद्रसिंह परदेशी, धाराशिवच्या पोलिस अधीक्षक रितू खोकर प्रत्यक्ष उपस्थित होते. तर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक शहाजी उमाप, लातूर पोलिस अधीक्षक अमोल तांबे व सागर पाटील सहायक पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) हे दुरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती (स्वीप) उपक्रमांचे वाघमारे यांनी कौतुक करत इतर जिल्ह्यांनीही मतदार जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचेही निर्देश दिले. तसेच मतदान करण्याच्या प्रकियेविषयी मतदारांमध्ये विविध प्रसिद्धी माध्यमांतून जनजागृती करावी, वृध्द (वय ८० वर्षांवरील), गरोदर महिला, दिव्यांग व्यक्ती यांना मतदान करणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात याव्यात. त्याचबरोबर आचारसंहिता काळात प्रशासनाने केलेल्या कारवाईसही विविध माध्यमांव्दारे प्रसिद्धी देण्याच्या सूचना वाघमारे यांनी यावेळी दिल्या.
निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व सुरक्षितरीत्या पार पाडण्याच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांनी मतदारांच्या प्रमाणात पुरेसे मतदान केंद्रे, ईव्हीएम मशीनची उपलब्धता, मतदान केंद्रावर मतदान अधिकारी व कर्मचारी यांची व्यवस्था, मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही, स्ट्राँगरूमची व्यवस्था व सुरक्षा करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे, याबाबत संगणकीय सादरीकरण केले.
दुबार मतदारांकडून संमतीपत्रे
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदारयाद्यांतील दुबार मतदारसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने दुबार नाव नोंदणी असलेल्या मतदारांकडून संमंतीपत्रे भरून घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिले. पोलिस महानिरिक्षक वीरेंद्र मिश्र, विशेष पोलिस महानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यांत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्था राखण्यात येत असल्याचे सांगत संवेदनशील मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे सांगितले.