

In the municipal elections, the Ajit Pawar group did not win a single seat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या चाव्या हाती घेण्याच्या दृष्टीने अजित पवार गटाने सर्व तयारीनिशी मनपा निवडणुकीत स्वबळावर मैदानात उडी घेतली. २९ प्रभागांतील ११५ जागांपैकी तब्बल ७८ ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यात सुमारे २२ मुस्लिम उमेदवारांचा समावेश करून पक्षाने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मतमोजणीनंतर पक्षाच्या पदरी एकही जागा न पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या पराभवातून अजित पवार गटाची पारंपरिक मतदार बँक पक्षापासून दुरावल्याचे दिसून आले. तर शहर कार्यकारिणीच्या मनमानी कारभाराचा फटका बसल्याची खदखद कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या सत्तेत सहभागी राष्ट्रवादी अजित पवार गटाने महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी युतीत न लढता स्वबळावर निवडणुक लढवली. त्यासाठी पक्षाने ७८ जागांवर उमेदवार दिले. यात पारंपरिक मतदार पाठीशी असल्याचे गृहीत धरून २२ मुस्लिम चेहरे पक्षाने निवडणुक रिंगणात उतरवले होते. मात्र आज वेगळे लढत असलो तरी युती तुटलेली नसून निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार असल्याचे वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा फटका पक्षाला बसला असून गेल्या काही निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देणारा मतदार यावेळी पूर्णतः दुरावल्याचे निकालांतून दिसून आले.
तसेच सत्तेत असूनही शहरात प्रभाव का नाही? असा सवाल आता खुद्द पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. तर शहर कार्यकारणीवर मनमानी कारभाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात उमेदवारी वाटपात पारदर्शकतेचा अभाव, स्थानिक कार्यकर्त्यांना डावलणे आणि काही निवडक नेत्यांभोवतीच निर्णयप्रक्रिया फिरल्यामुळे तळागाळातील कार्यकर्ता नाराज झाल्याचे बोलले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार असूनही कार्यकत्यांनी प्रच- ाराकडे पाठ फिरवल्याची चर्चा जोर धरत आहे.
सत्तेत सहभागी असूनही स्थानिक पातळीवर स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यात अपयश आल्याने अजित पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महापालिका निवडणूक हा केवळ इशारा मानून पक्षाने आत्मपरीक्षण केले नाही, तर या दारुण पराभवाचा फटका आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संघटनात्मक फेरबांधणी, शहर कार्यकारिणीतील बदल आणि नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी ही काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
पक्षनेतृत्वाने तत्काळ पावले उचलावीत
महापालिका निवडणुकीतील पराभवाचा बोध घेऊन पक्षनेतृत्वाने आतापासूनच पावले उचलावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून केली जात असून अशीच अवस्था राहिल्यास पक्षाला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही अशाच राजकीय फटक्यांना सामोरे जावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.