

In the attack case against Imtiaz, the bail applications of Qureshi and two others were rejected
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या प्रचार रॅलीत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी शेख नईम कुरेशी शेख छोटू कुरेशी, साजीद कुरेशी शरीफ कुरेशी आणि साहील कलीम कुरेशी या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी मंगळवारी (दि. २७) फेटाळले.
महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्व ाखाली ७ जानेवारीला शहरातील बायजीपुरा ते नवाबपुरा भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. उमेदवार फेरोज खान, मुन्शी भिकन शेख आणि अल्मास अमजद खान यांच्यासह १०० ते १५० लोक रॅलीत सहभागी झाले होते. रॅली बशीर लॉन्सजवळ आली असता आरोपी कलीम, हबीब, शकील, आवेज आणि इतरांनी घोषणा देऊन रॅलीवर आणि पोलिसांवर अंडी फेकली. तसेच रॅली अडवून गोंधळ घातला, घोषणाबाजी केली. तसेच इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.
जमावाने वाहनांची तोडफोड, दगडफेक, लाकडी दांडके व धारदार शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तथा सरकारी वकील राजू पहाडिया यांनी त्यांच्या जामीन अर्जाना विरोध केला.
राजकीय रॅलीत गोंधळ
आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून राजकीय रॅलीत गोंधळ घातला. तसेच हल्ला करून कारचे नुकसान केले. त्यामुळे सदर हल्ल्यामागे आरोपींचा उद्देश काय होता याचा शोध घेऊन शस्त्र जप्त करणे जरुरी आहे. आरोपींच्या पोलिस कोठडीशिवाय हे शक्य नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले.