

In Deolai, a hooligan goon assaulted and robbed a lodge owner
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देवळाई परिसरात सराईत नशेखोर गुंडांनी दहशत माजवत एका लॉज चालकाला बेदम मारहाण करून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. हल्ल्यात लॉज चालकाच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. ही घटना २४ फेब्रुवारीला श्रीनिवास लॉज येथे घडली. या गुंडांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरून तक्रार दिली नव्हती. मात्र याच गुंडांना काही दिवसांपूर्वी गटकाळ बंधूंवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केल्याचे समजल्यानंतर, लॉज चालकाने हिंमत दाखवत बुधवारी (दि.१) सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सोहेल पटेल आणि अबुझर पटेल (रा. देवळाई) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी शिवाजी भानुदास नजन (३०, रा. साईनाथनगर, बीड बायपास) यांच्या तक्रारीनुसार, देवळाई परिसरात श्रीनिवास लॉज चालवतात. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवळाईत राहणारे सराईत गुन्हेगार सोहेल पटेल आणि अबुझर शेख हे दोघेही नशेत लॉजवर आले.
त्यांनी नजन यांना दमदाटी करून झोपण्यासाठी एका तासासाठी रूमची मागणी केली. नजन यांनी घाबरून त्यांना रूम नंबर २०६ दिली. मात्र काही वेळाने या दोघांनी रूममध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि तिथे थुंकून घाण केली. नजन आणि त्यांचे सहकारी प्रवीण वानखेडे त्यांना रूम खाली करण्यास सांगण्यासाठी गेले. सोहेल आणि अबुझरने त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली.
अबुजर शेख याने नजन यांच्या खिशातून ९०० रुपये काढून घेतले. नजन यांनी पैसे परत मागितले असता अबुजरने काचेचा ग्लास त्यांच्या दिशेने भिरकावला. हा ग्लास त्यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर लागल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन रक्-तस्राव सुरू झाला.
जगणे मुश्कील करण्याची धमकी
घटनेनंतर नजन हे सातारा पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी पाठवले. तिथे त्यांच्या भुवईवर दोन टाके पडले. मात्र त्याचवेळी सोहेल पटेलने त्यांना फोन करून धमकी दिली की, जर माझ्या व अबुजर विरुद्ध पोलिसांत तक्रार दिली, तर तुमचे लॉज चालवणे आणि जगणे मुश्कील करून टाकेन. या धमकीमुळे घाबरलेल्या नजन यांनी त्यावेळी तक्रार देणे टाळले.
नशेखोरीची तक्रार दिल्याने केला होता हल्ला
सराईत गुन्हेगार सोहेल पटेल आणि अबुजर यांनी आपल्या इतर १० ते १५ साथीदारांसह २८ मार्च रोजी देवळाई भागातच अंकुश आणि लहू गटकाळ या भावंडांवर तलवार आणि सत्तूरने जीवघेणा हल्ला केला होता. रेशन आणि ड्रग्ज विक्रीच्या पोलिसांत तक्रारी दिल्याने हा हल्ला केला होता. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी या गुंडांना अटक केल्याची माहिती नजन यांना समजली. तसेच त्यांचे भाऊ रवी तोगे यांनी त्यांना धीर दिला. त्यामुळे नजन यांनी बुधवारी (दि.१) सातारा पोलिस ठाणे गाठून सोहेल पटेल आणि अबुजर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत.