

Drug mafia Ashpak Patel, who is spreading rumors as far as Nepal, arrested in Nashik
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील तरुण पिढीला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या ड्रग्ज सिंडिकेटचा मास्टरमाइंड अश्पाक पटेल याच्या मुसक्या अखेर गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. गेल्या २६ दिवसांपासून नेपाळ आणि उत्तर भारताच्या सीमांवर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या अश्पाकसह त्याच्या दोन साथीदारांना नाशिकच्या हॉटेल सॅफरॉनमध्ये बुधवारी (दि. १८) पहाटे फिल्मी स्टाईलने वेड्या ठोकण्यात आल्या, कारवाईदरम्यान त्याने पोलिसांना विरोध केला, मात्र खाकीने बळाचा वापर करत त्याचा माज उत्तरवला. कारवाईत आलिशान कार, ४ लाखांची रोकड, ४ मोबाईल असा १९ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत दिली.
शेख अश्पाक शेख इसाक ऊर्फ अश्पाक पटेल (३२, रा. रवींद्रनगर, शहाबाजार), पठाण दाऊद मुनावर खान (२८, रा. बायजीपुरा) आणि सरफराज मिर्झा हाफीज वेग (२७, रा. शहाबाजार) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तर सिंडिकेटचा आणखी एक आरोपी शेख फरदीन अब्दुल रज्जाक (रा. शहाबाजार) याला बुधवारीच गुन्हे शाखेने अटक केली होती. आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस आयुक्तांना अश्पाक हा नाशिक येथील वडाळा नाका भागातील हॉटेल सॅफरॉन येथे लपल्याची माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सूचना दिल्या. त्यानुसार, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, प्रवीण वाघ, श्रीकांत काळे, विजय निकम, राजेश यमदळ, विक्रम खंडागळे, दादासाहेब झारगड, जालिंदर गोरे, राहुल बंगाळे, अभिषेक बाठे, दिनकर आवारे, अक्षय नाटकर, अरुण भिसे, शाहरुख शेख, माया माळी, तातेराव शिनगारे यांच्या पथकाने बुधवारी रात्रीच नाशिक गाठले, अश्पाक हा कुख्यात असल्याने पोलिसांवर हल्ला करण्याची शक्यता होती. गुन्हे शाखेने अत्यंत तयारीनिशी छापा मारला. नाशिकचे गुन्हे शाखेचे पथक, क्यूआरटी असा सशख फौजफाटा सोबत घेण्यात आला होता. त्याने पोलिसांना विरोध केल्याने बळाचा वापर करून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
नेपाळसह उत्तर भारतात फिरला
पोलिस आयुक्तांनी ड्रग्ज सिंडिकेटला सुरुंग लावल्यानंतर अश्पाक २५ जानेवारीपासून फरार होता. त्याने कारमधून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहारमार्गे नेपाळ गाठले होते. गेल्या २५ दिवसांपासून तो या सर्व राज्यांमध्ये लपूनछपून राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची कार शहरात येऊन गेल्याचे समजताच पोलिसांनी माग काढणे सुरू केले होते. खबऱ्याने पोलिस आयुक्तांना माहिती देताच त्याच्या हातात नाशिकला बेड्या पडल्या.
टक्कल करून धिंड काढण्याची धास्ती
अश्पाक हा रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार असून, त्याच्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो पोलिसांवर हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिकची क्यूआरटी आणि स्थानिक पोलिसांचा सशख फौजफाटा दिमतीला घेण्यात आला होता. पोलिसांच्या या रुद्रावतारामुळे अश्पाकची मोठी गाळण उडाली असून, तेजा आणि टिप्याप्रमाणे आपलेही टक्कल करून पोलिस धिंड काढतील, अशी भीती त्याने न्यायालयात व्यक्त केल्याचे समजते.
मोहीम फत्ते होईपर्यंत पोलिस आयुक्त जागे अश्पाककडे शत्र असण्याची शक्यता असल्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांना मदतीसाठी पाठवण्याची विनंती केली. इकडून कारवाईसाठी गेलेल्या पथकाशी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले पहाटे चार वाजेपर्यंत संपर्कात राहून अपडेट घेत होते.
आता पार्टनर हाफिजचा नंबर
अश्पाकच्या नशेच्या धंद्यात शेख हाफिज शेख कलीम हा पार्टनर आहे. तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागेलला नाही. इशरत बैंक खात्यातून पैसे काढून अश्पाकला पुरवत होती. तिची पोलिसांनी कस्टडी घेतली आहे. २४ जानेवारीपासून चार गुन्हे दाखल करून सिंडिकेटचे २१ पेडलर्स, पुरवठादार अटक केले आहेत. या गुन्हेगारांसह अन्य ७० जणांची यादी तयार असून, त्यांच्या अनधिकृत घरांवर लवकरच मनपाचा बुलडोझर फिरणार आहे.