

Impersonator Thombre, pretending to be in the PMO, posted photos with leaders on social media
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री कार्यालयाचा सचिव, नीती आयोगाचा सदस्य असल्याची बतावणी करून मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या लग्नासमारंभात सत्कारासाठी उभा पोलिसांनी वेड्या राहताच ठोकलेल्या अशोक ठोंबरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. अनेक नेत्यांसोबत, अमेरिका, लंडन येथे गेल्याचे फोटो टाकून स्वतः देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा भास निर्माण करून त्याने हवा केल्याचेही दिसून येते. खोट्या ओळखीवर अनेक कामे मार्गी लावल्याचा संशय आहे. तसेच कोणाची आर्थिक फसवणूक केली का? याचा तपास होणार आहे. दरम्यान, त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी अशोक ठोंबरे सुमारे दहा-बारा वर्षांपासून दिल्लीत वास्तव्यास आहे. त्याचे कुटुंबीय पुण्यात राहतात. तो दोन्ही ठिकाणी अधूनमधून जात येत राहतो. काही वर्षांपूर्वी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत अकादमी चालवीत होता. त्यानंतर एनजीअ पेसाठी कन्सल्टन्सीचा व्यवसाय सुरू केला. दिल्लीत तो मोठमोठ्या नेत्यांसोबत विविध कार्यक्रमांत, प्रत्यक्ष भेटून फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करायचा. तर पुण्यात येणाऱ्या कलाकारांसोबत फोटोसेशन केल्याचे दिसते. मूळ गाव असलेल्या बीडच्या अंबाजोगाई, केज या भागातील लोकांना तो स्वतः आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करायचा.
नेहमी सुटाबुटात विविध कार्यक्रमांत हजेरी लावत असल्याने लोकांनाही त्याच्यावर कधी संशय आला नसावा. त्यामुळेच त्याला व्हीव्हीआयपी लग्नसोहळ्यात निमंत्रित केले. नाशिक येथेही त्याने एका लग्न सोहळ्यात हजेरी लावून संभाजीनगर गाठले होते. अधिक तपास एमआयडीसी वाळूज पोलिस करत आहेत.
विदेश वाऱ्या, फोटो मॉर्फ की खरे ?
अशोक ठोंबरेने सोशल मीडियावर अमेरिका, लंडन येथील विदेशी अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो त्याने मॉर्फ केले किंवा खरे आहेत, याचा तपास केला जाणार आहे. तसेच नेत्यांसोबतचे फोटो दाखवून आपली कशी उठ बस आहे हे दाखवून त्याने त्या जोरावर काही चुकीची कामे केली आहेत का, हेही तपासले जाणार आहे.
एका केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्ठमंडळासोबत लंडनवारी ?
अशोक ठोंबरेने एका केंद्रीय मंत्रांच्या शिष्ठमंडळासोबत लंडन येथे भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. तो गेला होता की फोटो मॉर्फ केले आहेत. गेला असेल तर कोणत्या अधिकाराने हेही तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.
विद्यापीठातही झाला होता सत्कार
दहा वर्षांपूर्वी अशोक ठोंबरे याचा विद्यापीठात तत्कालीन कुलगुरूच्या दालनात भव्य सत्कार पार पडला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर आहेत. तेव्हा त्याने काय बतावणी केली होती हे मात्र समजू शकले नाही.