

Main bus stand: Again under the code of conduct
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्य बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडत आले. नुकतीच अचारसंहिता लागू झाल्याने या कामाला ठेकेदार मिळणे अडचणीचे बनले आहे. एकाने काम सोडले, तर नवीन ठेकेदार मिळत नव्हता. आता पुन्हा अचारसंहिता लागू झाल्याने ठेकेदारही मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या पुनर्बाधणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्य बसस्थानकाची इमारत धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचे काम बीओटी तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसस्थानकाच्या निविदेबरोबरच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील बसस्थानकांच्या निविदा प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. त्यातील अनेक बसस्थानकांचे बांधकाम पूर्ण होऊन ते प्रवाशांच्या सेवेत कार्यरतही झाले आहेत, परंतु शहरातील मुख्य बसस्थानक मात्र अद्यापही ठेकेदारांच्या प्रतीक्षेतच आहे. आता अचारसंहिता लागू झाल्याने हे काम लांबणीवर पडल्याचे कारण एसटीच्या वतीने सांगण्यात येत आहे.
शहागंजची जागा बेवारसच
अनेक वर्षांपासून बेवारस अवस्थेत पडलेले शहागंज येथील जुने बसस्थानक या ठिकाणी कमर्शियल गाळे बनवण्याचे नियोजन एसटीच्या वतीने करण्यात आले होते, परंतु येथील अधिकाऱ्यांच्या थंड प्रतिसादामुळे हे कामही आडगळीत पडले असून, वर्षानुवर्षे बेवारस अवस्थेत असलेली जागा आजही तशीच पडून आहे.
ठेकेदाराची प्रतीक्षा संपेना
कोरोना काळाआधीच मुख्य बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेण्यात आले होते. दरम्यान, मनपा आणि एसटीच्या वादात हे काम रखडले. काम रखडल्याने ठेकेदारानेही माघार घेत हाती घेतलेले काम अर्ध्यावर सोडून दिले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांची अचारसंहिता, त्याचबरोबर निविदा काढूनही ठेकेदार मिळेना. ठेकेदारांचा शोध सुरू असतानाच पुन्हा अचारसंहिता लागू झाली. मुख्य बसस्थानकाच्या मागे लागलेला अचारसंहितेचा फेरा संपला नसल्याने त्या कामासाठी ठेकेदारही मिळण्यास अडचणी येत आहेत. या बसस्थानकाच्या पुनर्बाधणीला ठेकेदार मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.