

Shri Sant Eknath Maharaj palakhi Arrival in Paithan city
पैठण, पुढारी वृत्तसेवा पंढरपूर येथील आषाढीवारी सोहळ्यात सहभाग घेऊन भानुदास एकनाथ जयघोष करीत सोहळ्याचे सोमवारी (दि.२१) पैठणनगरीत आगमन झाले असून, यावेळी सोहळ्यातील वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात येऊन नाथांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली.
सालाबादाप्रमाणे पंढरपूर येथील आषाढीवारी सोहळ्यासाठी पैठणन गरीतून मार्गस्थ झालेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे ३३ दिवसांनंतर भानुदास एकनाथ गजर करीत सोमवारी सायंकाळी पालखी सोहळा टाळ-मृदंगांच्या तालावर भजन करीत हजारो वारकऱ्यांसोबत पैठणनगरीत आगमन होताच भाविक भक्ताने नाथांच्या पवित्र पादुकांचे पूजन करून दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
पंढरीहून आलेल्या वारकऱ्यांसह सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांचे भव्य स्वागत करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नाथांच्या पवित्र पादुकांची व चांदीच्या रथाची भव्य मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
यावेळी महिला भाविकांनी ठिकठिकाणी सडा टाकून रांगोळी काढून सोहळ्यावर पुष्पवृष्टी केली. प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, मंडळ अधिकारी कल्पना शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पादुका पूजन केले. नाथांच्या समाधी मंदिरात हजारो भागवत भक्ताच्या उपस्थितीत भजन करून सांज आरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.