

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेकडून मुंकुदवाडी, चिकलठाणा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बीड बायपास, आंबेडकरनगर, दिल्लीगेट, हसूल रोड यासह विविध ठिकाणी पाडापाडी करण्यात आली. या कारवाईनंतर नागरिकांमध्ये भविष्यातील निवाऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पाडापाडीनंतर बाधितांनी उर्वरित जागेतील बांधकामही पाडले अन् संपूर्ण जागेची भूमी अभिलेखकडून मोजणी करून घेत परवानगीसह बांधकाम केले, तर बाधित जागेच्या रोख मोबदल्याचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्याच्या रुंदीकरणाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशाने शहरातील आठ रस्त्यांच्या रुंदीकरणाआड येणारी पाच हजार बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहे. आता या पाडापाडीच्या मोहिमेनंतर बाधितांना आपल्या संपूर्ण जागेचा मोबदला प्रशासनाने द्यावा, अशी आशा लागली आहे. मात्र प्रशासकांनी अगोदरच बाधित मालमत्तांचा रोख मोबदला मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
त्यासोबतच अर्धवट पडलेल्या मालमत्तांचे बांधकाम करण्यापूर्वी बाधितांनी गुंठेवारीनुसार नियमितीकरण करून घ्यावे, तसेच बाधित जागेचा ताबा महापालिकेला देत असल्याचे शपथपत्रात नमूद करावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, बाधित जागेचा मोबदला मिळणार नाही, या भीतीने अनेक जण सध्या चिंतेत आहेत.
मात्र आता महापालिकेच्याच एका अधिकाऱ्याने यात रोख मोबदला कसा घेता येतो, याबाबत माहिती दिली आहे. सातबारामध्ये नोंदणी असलेल्या बाधितांनी आपल्या संपूर्ण जागेची भूमीअभिलेखकडून मोजणी करून घ्यावी. त्यानंतर बाधित जागेसह त्या मोजणी अहवालासह बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर करावा. या परवानगीनंतर मालमत्ताधारकाला बाधित जागेचाही मोबदला मिळू शकतो, असे संकेत त्यांनी दिले.
शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी बाधित ठरणाऱ्या मालमत्ता महापालिकेकडून पाडण्यात आल्या, त्या जागांवर पुन्हा अतिक्रमण किवा जागा ताब्यात घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पाडापाडीनंतरच्या उर्वरित जागेवर परवानगी घेऊनच बांधकाम करणे सोयीस्कर ठरणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.