

Bogus beneficiaries in grant scam on radar
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात २०१९ साली गोदावरी नदीला आलेला महापूर व अतिवृष्टीचे बोगस पंचनामे दाखवून अनुदान लाटणारे बोगस लाभार्थी शेतकरी आता महसूल विभागाच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, सात दिवसांत सरकारी तिजोरीत रक्कम न भरल्यास साताबारावर या रकमेचा बोजा चढविण्याचे आदेश शनिवारी (दि. १३) तहसीलदार सुनील सावंत यांनी दिले आहे. त्यामुळे कागदोपत्री निधी लाटणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
तालुक्यात २०१९ साली गोदा वरी नदीला आलेला महापूर व अतिवृष्टीमुळे डोणगाव येथील पिकांचे नुकसान झाले होते. घर व अन्य मालमत्तेचेही नुकसान झाले होते. यावेळी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शासनाने कृषी अधिकारी आदीनाथ सपाटे, तलाठी राकेश बच्छाव, ग्रामसेवक संजय राठोड यांची त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली होती. बोगस पंचनामे दाखवून बोगस लाभार्थी यांना मनमानीपणे अनुदान मिळवून दिल्याच्या तक्रारी होत्या.
या प्रकरणी प्रकाश साहेबराव डोखे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही चौकशी करण्यात आली. या चौकशीत शेतकऱ्यांना जास्तीची रक्कम वाटप झाल्याचे निष्पन्न झाले. ८३ शेतकऱ्यांना दहा लाख २१२ रुपये जास्तीचे वाटप झाल्याचे चौकशीत आढळून आले. तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकारी व लोकायुक्त यांनी या समितीला दोषी ठरवून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश ११ नोव्हेंबर २०२२ रोजी दिले होते. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी डोखे यांनी लोकायुक्त यांच्याकडे घोटाळा प्रकरणी तक्रार दाखल केली होती. लोक आयुक्त यांच्याकडे झालेल्या या सुनावणीतही समिती दोषी आढळल्याने कक्ष अधिकारी रवींद्र सामंत यांनी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना काढले होते.
या प्रकरणात २१ शेतकऱ्यांचे पेमेंट तक्रार प्राप्त झाल्यानतर थांबविण्यात आले. ७ शेतकऱ्यांनी जास्तीचे अनुदान मिळाल्याने ही रक्कम शासनाकडे परत केली. तर ५५ शेतकऱ्यांना ही रक्कम भरण्याचे आदेश तहसीलदार सुनील सावंत यांनी दिले. ही रक्कम न भरल्यास सातबारावर बोजा चढविण्याचा इशारा देण्यात आला आहे.