

Husband and wife seriously injured in beating by thieves in Takli Ambad
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील टाकळी अंबड शिव-ारातील नरके वस्तीवर मध्यरात्री तीन ते चार चोरट्यांनी धुमाकूळ घालून पती-पत्नीला बेदम मारहाण केली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दुचाकीवर डल्ला मारला. गुरुवारी (दि.११) रात्री बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील शेती वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पैठण शहागड रोडवरील टाकळी अंबड शिवारातील विहामांडवा टाकळी अंबड रस्तावरील नरके शेतवस्तीवर रा-हणाऱ्या एका शेतकरी दाम्पत्यास चोरट्यांनी बेदम मारहाण करून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व शेड समोर उभा केलेल्या दुचाकीसह रोख रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली.
चोरट्यांच्या मारहाणीत कांता देवराव भाकड, लीलाबाई कांता भाकड हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरील पती-पत्नी यांची टाकळी अंबड शिवारात शेतजमिनी असल्याने ते विहामांडवा-टाकळी अंबड रस्त्यावरील नरके वस्तीवर कुटुंबासह पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहेत. दिवसभराचे कामे उरकून कुटुंब रात्री झोपी गेले.
मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक शेडच्या बाहेर मोबाईल चमकवत असल्याचे दिसले. चोरट्यांचा संशय आल्याने दोघे सावध झाले. लीलाबाई यांनी दार बंद केले, तोच चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात जोराने लाकडी दांडा मारला. यांत लीलाबाईचे डोके फुटून त्या जमिनीवर कोसळल्या व चोरट्यांनी पत्र्याच्या घरात प्रवेश करून त्यांना काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील पोत, मंगळसूत्र, कर्णफुले ओरबाडून अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पोबारा केला.
घटनेमध्ये भाकड दाम्पत्याच्या डोक्या व हातापायाला जबर मार लागल्याने त्यांना ग्रामस्थांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कांता देवराव भाकड, लीलाबाई कांता भाकड यांना तात्काळ प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित पोलिस पथकासह व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष दरोडा पथकाने घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथकालाही पाचारण केले होते. या श्वानाने घटनास्थळी चोरट्यांचा पडलेला शर्ट, चपलांवरून माग शोधण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप अधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गर्शनाखाली सपोनि सचिन पंडित, पोलिस उपनिरीक्षक हरिभाऊ बोबडे, किशोर शिंदे, चरणसिंग बालूदे करीत आहेत.
भाकड कुटुंबीय चोरट्यांना काय न्यायचे ते घेऊन जा, परंतु मारू नका म्हणून विनवणी करू लागले. लीलाबाईने आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता चोरट्याने त्यांचे डोके लाकडी खाटावर आणि जमिनीवर आपटले. यामुळे डोक्याला गंभीर मार लागला. रक्तबंबाळ होऊन त्या बेशुद्ध पडल्या, यावेळी त्यांचे पती कांता भाकड यांनी चोरट्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्याने थेट त्यांना दांड्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये कांता यांच्या डोक्याला जोरदार मार लागला असून, तोंडातील जबडाही तुटला आहे. चोरट्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे तेही रक्ताबंबाळ होऊन बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत होते. मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी काही अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना आवाज दिला तेव्हा शेजारी घटनास्थळी धावले.