

Action will be taken against those who loot by charging excessive GST
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा केंद्राने जीवनावश्यक आणि दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंसह ४३ इंचपेक्षा मोठा टीव्ही, एसी, दुचाकी, चारचाकी वाहनांवरील जीएसटी कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. येत्या २२ तारखेपासून हे नवीन स्लॅब लागू होणार आहेत. मात्र व्यावसायिकांनी या वस्तूंवर जुनाच म्हणजे जास्तीचा जीएसटी लावल्यास ग्राहकांनी त्याची थेट तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले असून, अशा व्यावसायिकांवर कारवाईही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एक देश एक कर या आश्वासनासह केंद्र सरकारने आठ वर्षांपूर्वी वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायदा लागू केला. आतापर्यंत यात अनेक बदल झाले आहेत. नुकतेच जीएसटी परिषदेने वस्तू आणि सेवा कर दरांमध्ये नवीन बदल करून लहान-मोठे व्यापारी आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. यात अनेक दैनंदिन GST अन्नपदार्थांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कर कमी केला. टीव्ही, ४३ इंचांपेक्षा मोठे एलईडी, एसी, ३५० सीसीपर्यंतची दुचाकी-चारचाकी वाहने यावरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला आहे.
नवी सुधारित कर रचना येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. मात्र काही व्यापारी जुना स्टॉक आहे, आधीचा माल आहे, अशा युक्त्या करून जुनाच म्हणजे जास्तीचा जीएसटी लावून ग्राहकांची लूट करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्या ग्राहकांनी थेट जीएसटी पोर्टल किंवा आपले सरकार अॅपवर संबंधित व्यावसायिकाची तक्रार करावी. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर वस्तू व सेवा कर विभागाकडून करण्यात आले आहे.
ग्राहकांना थेट लाभ मिळावा, यादृष्टीने जीएसटी परिषदेने दैनंदिन वापराच्या आणि अनेक जीवनाश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा करात कपात केली आहे. २२ सप्टेंबरपासून नवीन दर - लागू होणार आहे. या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास ग्राहकांनी जीएसटी पोर्टल किंवा आपले सरकारवर करावी. त्यानुसार कारवाई केली जाईल. अभिजीत राऊत, सह-आयुक्त, वस्तू व सेवा कर.
काही व्यापारी, व्यावसायिक चालबाजी करून आमचा आधीचा माल असून, जुन्या म्हणजेच जास्तीच्या जीएसटीने खरेदी केलेला स्टॉक आहे. त्यावर जुनाच जीएसटी लागेल. अशा प्रकारे बतावणी करून ग्राहकांची लूट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वस्तू व सेवा कर विभागाकडून तक्रारीचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच व्यापाऱ्यांनीही नवीन जीएसटी स्लॅबचा थेट ग्राहकांना फायदा द्यावा, असेही म्हटले आहे.