

Hunger strike against the institution's administrators and headmaster
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा: जटवाडा रोडवरील राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळेचे सचिव आणि मुख्याध्यापकांविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शाळेतील सहशिक्षक बाळू वैजिनाथ पवार यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळपासून या उपोषणाला सुरुवात झाली. संस्थेच्या अध्यक्षा दुर्गा गतखने, संस्था सचिव ऋषिकेश गतखने आणि मुख्याध्यापक योगेश राठोड हे शासनाची आर्थिक लूट करत असून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळत आहेत, असा आरोप उपोषणकर्त्यां शिक्षकांनी केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शाळेने बोगस विद्यार्थी व बोगस आधार गैरवापर करून सदरील विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केली आहे तसेच शासनाच्या तिजोरीची आर्थिक लूट केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी, शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळा तपासणीचे पत्र काढूनही प्रत्यक्ष तपासणी टाळली आहे.
शालेय पोषण आहारातील आर्थिक लूट करणाऱ्या संस्था सचिव व मुख्याध्यापक यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आपल्या कार्यालयातील अहवालात विद्यार्थी संख्या १४४ असूनही संचमान्यतेत शिक्षक संख्या वाढीव आलेली आहे असेही यात म्हटले आहे. अशोक ढमढेरे, विनोद केनेकर, कृष्णा गोंडे, विलास चव्हाण, पद्माकर पगार, रावसाहेब बोरसे, अजित जाधव, संभाजी जाधव, रवींद्र मगर, रामेश्वर गोराडे, सचिन मुसळे, सागर सूर्यवंशी, सोनाली गव्हाणे, स्वाती बोंडे, रेखा साकळे, अरुणा चौधरी, सविता हिंगे, शीतल कवडे यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.