

Sambhajinagar News : 41 applications rejected in the district; 2281 valid
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हाभरातून सुमारे २३२२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच गुरुवारी सर्व तालुक्यांमध्ये ६३ गट आणि १२६ गणांसाठी दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. छाननीदरम्यान ४१ अर्ज बाद झाले असून २२८१ अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी ४० टक्क्यांहून अधिक उमेदवार अपक्ष असल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
अर्ज छाननीनंतर रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार कायम राहिल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अपक्ष आणि बंडखोरांना माघार घ्यायला लावण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी २३, २४ आणि २७जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत संधी देण्यात आली आहे. अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप २७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीननंतर जाहीर करण्यात येणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार असून मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.
अपक्ष, बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न
दरम्यान, पुढील चार दिवसांत वरिष्ठ नेते वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून अपक्ष व बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार येणार आहे. मात्र माघारीनंतरच खरी लढत किती रंगणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत जिल्ह्यात राजकीय पातळीवर वेगवान हालचाली घडणार असल्याने इच्छुकांचे देव तोपर्यंत पाण्यात असतील.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ७ अर्ज बाद
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर तालुक्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवारी पार पडली. तालुक्यातील एकूण ३८३ अजर्जापैकी गटातील ३ आणि गणातील ४ असे एकूण ७ अर्ज अवैध ठरले. छाननीनंतर ३३६ उमेदवारांचे ३७६ अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. अर्ज मागे घेण्याची मुदत २३ ते २७ जानेवारी दरम्यान असून, तालुक्यातील १० गट आणि २० गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा परिषदेसाठी १२३ उमेदवारांनी १४६ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २१ अर्ज डबल, तर एक अर्ज ट्रिपल होता. छाननीनंतर १२० उमेदवारांचे १४३ अर्ज वैध ठरले. पंचायत समितीच्या २० गणांसाठी २२० उमेदवारांनी २३७ अर्ज दाखल केले होते. त्यातील ४ अर्ज अवैध ठरले, तर १७ अर्ज डबल होते. अंतिमतः २१६ उमेदवारांचे २३३ अर्ज वैध ठरले आहेत.
अर्जाची छाननी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पार पडली. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, अप्पर तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार उत्कर्षा पाटील यांच्या पथकाने ही प्रक्रिया पार पाडली. उमेदवारांना प्रत्यक्ष बोलावून अर्ज वैध अथवा अवैध ठरण्याची कारणे माईकवर वाचून दाखवण्यात आली. दरम्यान अनेक उमेदवारांनी एकाच गटातून एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. काहींनी पक्षाकडून अर्ज भरले असले तरी एवी फॉर्म जोडला नसल्याने ते अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आले.
जिल्हा परिषद गटात तीन बाद
जिल्हा परिषदेसाठी लाडसावंगी, करमाड आणि दौलताबाद या गटांतील प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला. लाडसावंगी गटात भाऊसाहेब निकाळजे यांच्या अर्जासोबत शपथपत्रावर नोटरी नसल्याने अर्ज बाद झाला. करमाड गटात सपना कांबळे यांचे नाव मतदार यादीत नसल्याने अर्ज अवैध ठरला. दौलताबाद गटात ज्योती जगधने यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता; मात्र त्यांचे नाव उमेदवार यादीत नसल्याने अर्ज बाद करण्यात आला.
पंचायत समिती गणः चार बाद
पंचायत समितीमध्ये सावंगी गणात शहनाज बेगम नदीम शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला होता; मात्र त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याने अर्ज अवैध ठरला. दौलताबाद गणात संतोष सुराशे यांच्या अर्जात उमेदवार व सूचक एकच व्यक्ती असल्याने अर्ज बाद झाला. तिसगाव गणात ज्योती जगधने, तर गेवराई बु. गणात मोहम्मद जोहेब इशान शेख जबार यांची नावे मतदार यादीत नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले.