

HPCL employee defrauded of ₹48 lakh under the pretext of share trading
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शेअर बाजारात अपस्टॉक्स डीएमए खात्याद्वारे ट्रेडिंग करून भरघोस नफा कमवून देण्याचे आणि नामांकित कंपनीचा आयपीओ तब्बल २२ टक्के सवलतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ३७ वर्षीय एचपीसीएल कर्मचाऱ्याची तब्बल ४८ लाख १५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुकुंदवाडी भागात घडला. याप्रकरणी रिया कपूर नावाच्या महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवनीश कुमार (३७, रा. एकवीरा हॉस्पिटलजवळ, सोहम मोटर्स रोड, मुकुंदवाडी, मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीनुसार, ते गेल्या एका वर्षापासून शहरात वास्तव्यास असून एचपीसीएल कंपनीत नोकरी करतात. ऑगस्ट २०२६ च्या अखेरीस अवनीश यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून रिया कपूर या महिलेने कॉल केला.
मी अपस्टॉक्स डीएमए अकाउंट्स हाताळणारी अधिकृत प्रतिनिधी असून, या खात्याद्वारे शेअर बाजारात थेट मोठी कमाई करता येते, अशी बतावणी तिने केली. ३१ ऑगस्ट रोजी तिने अवनीश यांना व्हॉट्सअॅपवर अर्ज पाठवून त्यांचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, पत्ता आणि ई-मेल आयडी अशी वैयक्तिक माहिती भरून घेतली. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी तुमचे डीएमए खाते मंजूर झाले आहे, असा निरोप देऊन त्यांना एका हेल्प अँड सपोर्ट टीमशी जोडण्यात आले आणि मोबाईलमध्ये यूप्राईम नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
खात्यावर लावला ९.१५ लाखांचा लीन; डोळे उघडले
अवनीश यांनी आपल्या उपलब्ध रकमेनुसारच शेअर्स देण्याची विनंती केली, मात्र आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. मानसिक तणावात असतानाच ७ ऑक्टोबर रोजी अवनीश यांना धक्का बसला. पैसे परत मिळण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यावर ९ लाख १५ हजार ९९७ रुपयांची रक्कम लीन लावण्यात आल्याचे बँकेकडून समजले. अशा रीतीने स्वतः भरलेले ३९ लाख आणि खात्यावर ब्लॉक झालेले ९ लाख १५ हजार ९९७ रुपये मिळून एकूण ४८ लाख १५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केली. तेथून मुकुंदवाडी ठाण्याकडे हे प्रकरण वर्ग झाले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे करत आहेत.
एव्हरेस्ट आयएमएस' आयपीओचा ट्रॅप; ७८ लाखांचे शेअर्स वाटप
२९ सप्टेंबर रोजी त्यांनी अवनीश यांना एव्हरेस्ट आयएमएस आयपीओ मध्ये २२ टक्के सवलतीत शेअर्स मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याच दिवशी अवनीश यांनी ६ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता, आयपीओ अर्जामुळे तुमची रक्कम ब्लॉक झाली आहे, शेअर्सचे लिस्टिंग झाल्यावर सर्व रक्कम काढता येईल, अशी बतावणी करून विथड्रॉल नाकारले. ६ ऑक्टोबर रोजी भामट्यांनी संदेश पाठवून, तुम्हाला १ लाख १२ हजार शेअर्स वाटप झाले असून त्यांची किंमत सुमारे ७८ लाख ३ हजार ४० रुपये आहे, असे सांगितले. मात्र, अॅपमध्ये अवनीश यांची केवळ ५२ लाख रुपये शिल्लक दिसत होती. आरोपींनी उर्वरित फरक भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली.
विश्वास जिंकण्यासाठी विथड्रॉल दिले; मग ५ लाखांचा नवा डाव टाकला
यूप्राईम अॅपमध्ये शेअर्सची खरेदी-विक्री आणि मोठा नफा दिसत असल्याने अवनीश यांचा प्लॅटफॉर्मवर पूर्ण विश्वास बसला. त्यांनी खात्री करण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी ५८ हजार रुपये बँक खात्यात काढण्याची विनंती केली. ही रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात हिंद प्लास्टच्या नावे जमा झाली. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्यांनी ४ लाख ९८ हजार रुपये काढले असता, तेही जीवचार टूर अँड ट्रॅव्हल्स प्रा. लि.च्या खात्यातून त्यांच्या बँकेत जमा झाले. मात्र, अवघ्या १० मिनिटांतच त्यांच्या खात्यावर आणखी ५ लाख जमा झाले. लगेचच आरोपींनी संपर्क साधून, आमच्याकडून चुकीने दुसऱ्या व्यक्तीचे ५ लाख तुमच्या खात्यात आले आहेत, कृपया ते परत करा, अशी विनंती केली. भामट्यांचा प्रामाणिकपणा पाहून अवनीश यांनी ती रक्कम आरोपींनी दिलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर परत पाठवून दिली.
सेबीच्या नावाने ५ दिवसांत उकळले ३९ लाख रुपये
नोंदणी झाल्यानंतर डीएमए खात्यामध्ये सामान्य बँक खात्यातून थेट पैसे जमा करता येत नाहीत, त्यासाठी सेबी मान्यताप्राप्त खात्यांमध्येच निधी हस्तांतरित करावा लागतो असे सांगण्यात आले. अवनीश कुमार यांनी १८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या अवघ्या ५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ३९ लाख रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांत ट्रान्सफर केले,