

Hotel owner fatally attacked for not providing free food
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातून हद्दपार केलेल्या गुन्हेगाराने दररोज फुकटात जेवण देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल चालकाचे लोखंडी रॉडने डोके फोडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास न्यू जनता हॉटेल, जुना मोंढा येथे घडली. शिवा राजकिरण चावरिया (२८, रा. गांधीनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
फिर्यादी शेख नाजीम शेख शेरू (४०, रा. न्यू बायजीपुरा) यांच्या तक्रारींनुसार, ते चुलत भाऊ शेख नफीससोबत न्यू जनता नावाने जुना मोंढा येथे हॉटेल चालवितात. मागील काही दिवसांपासून आरोपी शिवा चावरिया हा रात्री हॉटेलात येऊन दमदाटी, शिवीगाळ करून फुकट जेवण घेऊन जात होता. शुक्रवारीही रात्री साडेदहाच्या सुमारास शेख हे हॉटेल बंद करून त्यांचे कामगार किरण मसुरे आणि रिजवान अन्सारी सोबत घरी निघत असताना चावरिया हातात दांडा घेऊन आला. मुझे फुकट में खाना दे दो, नही तो आपको जान से मार दूंगा, अशी धमकी देत असताना शेख यांनी त्याच्या हातातील दांडा काढून घेत त्याची समजूत घालून परत पाठवून दिले.
थोड्या वेळाने शिवा पुन्हा हातात रॉड घेऊन हॉटेलसमोर आला. शेख बाहेर येताच त्याने जान से मार दूंगा म्हणत त्यांच्या डोक्यात जोराचा प्रहार करून रक्तबंबाळ केले. दुसऱ्यांदा वार करताच तो शेख यांनी हातावर झेलल्याने त्यांचा हात फॅक्चर झाला. त्यानंतर शिवाने रॉडने त्यांच्या कपाळावर, पोटात डाव्या बाजूने मारून गंभीर जखमी करून पळून गेला.
याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल झाला असून, अधिक तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करत आहेत हद्दपार असताना घरीच मुक्काम हद्दपार गुन्हेगार शहरात बिनधास्तपणे फिरून पुन्हा गुन्हे करत असल्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. क्रांती चौकच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे ठाण्यात लक्ष नसल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे. शिवा चावरियाला ऑक्टोबर २०२४ रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. तरीही तो घरीच अवास्तवास होता हे डीबी पथकालाही समजले नाही, हे विशेष.