

Vasmat, Phulambri entire election postponed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जारी केलेल्या एका आदेशामुळे मराठवाड्यातील वसमत, फुलंब्रीची संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच पुन्हा नव्याने घेण्यात येणार आहे. याशिवाय मुखेड, धर्माबाद नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. काही प्रभागांनाही या निर्णयाचा फटका बसला असून, त्याठिकाणी २० डिसेंबरला मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद (अपील करणे) मागण्यात आली. त्या प्रकरणात २२ नोव्हेंबरपर्यंत निवाडा होणे अपेक्षित होते. त्यामुळे उमेदवारांना माघार घेण्यास तीन दिवसाच्या अवधी मिळाला असता; पण काही ठिकाणी उमेदवारांना अशी संधी मिळाली नाही. अशा ठिकाणी २६ तारखेला निवडणूक चिन्हांचे वाटप केले गेले, ही बाब नियमबाह्य ठरवत आयोगाने संबंधित नगर परिषदांसाठी शनिवारी रात्री सुधारित कार्यक्रम जारी केला. त्यामुळे धर्माबाद, मुखेडची निवडणूक दोन तारखेला होणार नाही.
भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगर परिषद निवडणुकीत प्रत्येकी एका प्रभागाचे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाचा निकाल लागण्यास विलंब झाल्याने वैजापूर, गंगापूर, आणि पैठण नगरपरिषद क्षेत्रातील आठ सदस्यांच्या निवडणुकीलादेखील स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त ऋषीकेश भालेराव यांनी दिली.
पूर्णा, जिंतूर, अंबाजोगाई, मुखेडला फटका
पूर्णा येथे दोन प्रभागांतील सदस्य पदांच्या ांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षपदासह उर्वरित २१ सदस्यांच्या निवडणुका मात्र पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसारच २ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. नगर परिषदेच्या प्रभाग क्र.१, जागा क्र. (ब) (आरक्षण सर्वसाधारण) व प्रभाग क्र. १०, (आरक्षण ना.मा.प्र.) या दोन्ही जागांबाबत दाखल अपीलांवर जिल्हा न्यायालयाचा निर्णय २२ नोव्हेंबरनंतर देण्यात आल्यामुळे हा निर्णय झाला. जिंतूरमध्येही ११ (क) ची निवडणूक होणार नाही. वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ३ तर सदस्यपदासाठी ७उमेदवारांनी दाखल केलेल्या अपीलवर न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी निकाल दिला.
या अपीलांवरील निर्णय उशिरा लागल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी उमेदवारांना उपलब्ध झाला नाही. परिणामी संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून सुधारित कार्यक्रम जारी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. हिंगोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ५ (ब) आणि ११(ब) या दोन जागांसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे.
रेणापूर नगरपंचायत अध्यक्ष व प्रभाग क्रमांक एकची निवडणूक लांबणार आहे. तसेच भोकरदन प्रभाग क्र १ मधील "अ" व प्रभाग ९ मधील "ब" येथील निवडणूक रद्द झाली असून दोन्ही ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केले आहे. देऊळगाव राजा, वाशिमची प्रक्रियाही पुन्हा नव्याने होणार आहे. अंबाजोगाई मधील ४, बीड आणि धारूरच्या एका प्रभागातही निवडणूक लांबणीवर पडली आहे. धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांसाठी (प्रभाग क्र. २ अ, ७ ब आणि १४ ब) निवडणूक आता पूर्वनियोजित तारखेला होणार नाही.
सुधारित निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ४ डिसेंबर २०२५
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत
निवडणूक चिन्ह नेमून अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याचा दिनांक ११ डिसेंबर २०२५
आवश्यकता असल्यास मतदान २० डिसेंबर २०२५
मतमोजणी व निकाल २१ डिसेंबर