

E-Bus ST Corporation's expenses are more than its income
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर: सप्टेंबर-२०२४ पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध मार्गावर ई-बससेवा सुरू झाली आहे. ई-बस प्रवाशांच्या पसंतीस उतरली असली तरी त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ई-बस महामंडळासाठी पांढरा हत्ती ठरत आहे. या बसमधून येणाऱ्या उत्पन्नापेक्षा एसटीचा खर्च अधिक होत असल्याने महामंडळाला या बस कंपनीला खिशातून पैसे देण्याची वेळ आली आहे. मागील ७ महिन्यांत सुमारे ५ कोटींपेक्षाही जास्त रक्कम संबंधित कंपनीला देणे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एसटी महामंडळ एकीकडे तोट्यात चालल्याचे सबब पुढे करून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व इतर सुविधा देण्यास मागे पुढे करत आहेत. दुसरीकडे मात्र ई-बस कंपनीला कोट्यवधी देऊन त्यांचे खिसे भरण्याचे काम करत आहे. एसटीचे चालक-वाहक रक्ताचे पाणी करून उत्पन्न आणत आहेत. हेच उत्पन्न महामंडळ खासगी बस कंपनीच्या खिशात घालत आहे.
या बसला एसटी महामंडळ प्रतिकिलोमीटर ६८ रुपये (९ मीटर) तर मोठ्या बसला (१२ मीटर) प्रतिकिलोमीटर ७३ रुपये देण्याचा करार केला आहे. मात्र या बसमधून एप्रिल ते ऑक्टोबर-२०२५ पर्यंतच्या उत्पन्नाचा आढावा घेतला तर प्रतिकिलोमीटर ५३ ते ५६ रुपयांचे उत्पन्न होत आहे. कराराप्रमाणे कंपनीला मात्र ठरलेली रक्कम द्यावीच लागणार आहे. त्यामुळे या ७ महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विभागातून सुमारे ५ कोटी १४ लाख ८ हजार १३ रुपये संबंधित बस कंपनीला द्यावे लागणार आहेत.
या मार्गावर आहे सेवा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ई-बसची सेवा जालना, राजूर, सिल्लोड, पैठण, नाशिक, पुणे, आकोला, नंदूरबार, चोपडा, परळी आदी मार्गावर सुमारे ६८ बस सुरू आहेत. या बसच्या माध्यमातून एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत १८ कोटी ६१ लाख १ हजार ३५९ रुपयांचे उत्पन्न झाले. कंपनीच्या करारानुसार अपेक्षित २३ कोटी ७५ लाख ९ हजार ३५४ रुपये व्हायला पाहिजे होते. कराराप्रमाणेही उत्पन्न न झाल्याने आता एसटीला ही तूट म्हणजे ५ कोटी १४ लाख ८ हजार १३ रुपये संबंधित कंपनीला देणे आहे. यात एका वाहकाचे वेतन आणि त्याला मिळणारा ओव्हरटाईम अंदाजित एक दिवसाचे एक ते दीड हजार रुपये जरी गृहित धरले तर या ७ महिन्यांत ३ लाखांपेक्षाही जास्त वेतन मोजावे लागेल. बसचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याने हा प्रकार हत्ती पोसण्यासारखाच झाला आहे.