

Himachal businessman cheated of Rs 13 lakhs
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हिमाचल प्रदेशच्या व्यापाऱ्याकडून ४६५ पेटी सफरचंद मागविल्यानंतर ठरलेल्या भावाप्रमाणे पैसे न देता १२ लाखांचा गाडीतील माल परस्पर कमी भावात विक्री करून केवळ ३ लाख पाठवून उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केली. त्याचप्रमाणे अन्य एका व्यापाऱ्यालाही पावणेपाच लाखांचा असाच गंडा घातला. हा प्रकार ६ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान जाधववाडी मंडी भागात घडला. एस. के. शान (रा. जाधववाडी) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी बिपीन राजेश चौहान (३०, रा. बिज्मल, शिमला, हिमाचल प्रदेश) याच्या तक्रारीनुसार, तो मुंबई, कोलकाता व अन्य राज्यात अडत्यांना सफरचंद विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा मित्र रमन शर्माने जाधववाडीचा आडत्या एस. के. शान याची शान फूट एजन्सी असल्याचे सांगून चांगला भाव देतो, असे म्हणाला. त्यावरून चौहानने संपर्क केल्यानंतर सफरचंदाचे फोटो पाठवून मालाचा भाव ठरविण्यात आला.
मोठ्या आकाराचे ३ ते ३२००, चिते १८००-२२०० असा भाव मिळेल, असे शानने सांगितले. त्यावरून चौहानने ४६५ पेटी वेगवेगळ्या आकाराचे सफरचंद ११ लाख ६४ हजारांचा माल गाडीमध्ये पाठविला. गाडी ६ ऑगस्टला जाधववाडीत पोहोचली, तेव्हा चालक बारूरमने माल दाखविल्याने शानला तो आवडला. त्याला ठरल्याप्रमाणे माल विक्री करावा अन्यथा करू नये, असे कळविले होते. मात्र शानने परस्पर २ लाख ९९९ रुपये चौहानला पाठवून दिले.
एवढ्याच पैशात माल विक्री झाल्याने सर्व पैसे पाठवले, आता मला परत पैसे मागायचे नाही, असे म्हणत टाळाटाळ केली. तसेच अनिल ठाकूर (रा. कुलू, हिमाचल प्रदेश) यांच्याकडूनही सरचंद घेऊन आरोपीने ४ लाख ६३ हजारांची फसवणूक केली. एकूण १३ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्यावरून सिडको पोलिस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सिडको पोलिस करीत आहे.