

High-powered committee for every district in Marathwada: Vikhe-Patil
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी जुन्या नोंदी आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याकरिता मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्तरावर स्वतंत्र उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
शनिवारी सायंकाळी डॉ. विखे-पाटील यांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जरांगे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विभागीय स्तरावरून आधीच नियमावली (एसओपी) तयार करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी जुनी कागदपत्रे आणि नोंदी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रमाणपत्रे वाटपात अडथळे येत होते. आता ही अडचण कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर एक विशेष समिती स्थापन केली जात आहे. या समितीला सर्व आवश्यक अधिकार प्रदान केले जातील, ज्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांना कागदपत्रे आणि नोंदी सहजतेने मिळतील. ठरल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून याचा अधिकृत शासन निर्णय लवकरच काढला जाईल.
डॉक्टरांशी प्रकृतीबाबत चर्चा
विखे-पाटील यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी सविस्तर संवाद साधून जरांगे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. दीर्घ उपोषणामुळे जरांगे यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. त्यांना सध्या विश्रांतीची नितांत गरज असून प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. दोन ते तीन दिवसांत त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा अपेक्षित आहे, असे विखे-पाटील म्हणाले.