

Heavy rains again in 40 mandals in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : काही महिन्यांपासून सातत्याने नुकसान सोसणाऱ्या मराठवाड्याला पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. लातूर, बीडसह पाच जिल्ह्यांतील तब्बल ४० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तर इतर शेकडो महसूल मंडळांमध्येही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या अतिवृष्टीतून बचावलेल्या शेती पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
मागील आठ दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत तब्बल ४० ठिकाणी मुसळधारेसह अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. जून, जुलै, ऑगस्टसोबतच सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी अद्याप सावरलेला नसताना पावसाने पुन्हा अडचणीत भर टाकण्याचे काम केले आहे. परतीच्या पावसाने राज्यातून केव्हाच माघार घेतली आहे. मात्र सततच्या चक्रीवादळाच्या परिणामी देशाच्या समुद्रकिनारी आणि काही राज्यांवर अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. एक चक्रीवादळ सहमत नाही की लगेच दुसरे वादळ उभे राहत आहे. यामुळे ऑक्टोबर संपत आला तरीही पावसाची हजेरी कायम आहे. मंगळवार, २८ च्या रात्रीपासून ते बुधवार, २९ च्या पहाटेपर्यंत सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळला.
विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, विभागात सरासरी २४.८ मि.मी. पाऊस कोसळला. बुधवारपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत हे २१. १ टक्के जास्त आहे. यात मराठवाड्यातील एकूण ४० सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वच जिल्ह्यांना पावसाने धुवून काढले. यात सर्वाधिक ६२. ६ मिमी पाऊस लातूर जिल्ह्यात कोसळला. एकूण ४० पैकी लातुरात सर्वाधिक २७ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर यासोबतच जालन्यातील २, बीडमधील ८ तर परभणी जिल्ह्यातील २ सर्कलचा समावेश आहे. याशिवाय संभाजीनगर जिल्ह्यातील एका सर्कलमधेदेखील अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा अवकाळी पाऊस ३ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज एमजीएम वेधशाळेचे संचालक तथा हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.
पावसाचा मुक्काम ३ नोव्हेंबरपर्यंत
मराठवाड्यात पावसाचा मुक्काम ३ नोव्हेंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. एरव्ही सप्टेंबरमध्ये पाऊस परतीच्या वाटेल निघतो तर ऑक्टोबरमध्ये प्रचंड उन्ह तापते. मात्र यंदा ऋतुचक्र बदलले आहे. ऑक्टोबर संपून नोव्हेंबर सुरू होत असतानाही पाऊस सुरूच आहे, असे हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.