

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम चांगलाच वाढला असून सलग दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे शेतातील मका, सोयाबीन व वेचणीला आलेल्या कापसातील सरकीला कोंब फुटली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेली धगफुटीसदृश पाऊस व आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई दिवाळीतही शेतकऱ्यात खात्यात जमा झाली नाही. यामुळे शेतकऱ्यात संतापाची लाट आहे.
वीज पडून दोन जनावरे दगावली, शेतकऱ्यांवर अस्मानी पाठोपाठ सुल्तानी संकट
सिल्लोड : राजु वैष्णव
मंगळवारी (दि. २८) दुपारी अवकाळी पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. तर अंभई शिवारात वीज पडून एक म्हैस व छोटे कालवड अशी दोन जनावरे दगावली. तालुक्यात सलग दहा दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. तर वेचणीला आलेल्या कापसातील सरकीला कोंब फुटली आहे. आधीच अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर सततच्या अवकाळी पावसामुळे सुल्तानी संकट ओढावले आहे.
तालुक्यात अवकाळी पावसाचा मुक्काम चांगलाच वाढला असून सलग दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे शेतातील मका, सोयाबीन व वेचणीला आलेल्या कणमातील माकीला कोंब फुटली आहे. सततच्या पावसामुळे जनावरांचे हाल होत असून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मंगळवारी तर पावसाने तालुका अक्षरशः झोडपून काढला. घाटनांद्रा, आमठाणा, तळणी, केळगाव, अंभई, उंडणगाव, आसडी, रहिमाबाद, अन्वी, सारोळा, पालोद, हट्टी, मांडणा, लिहाखेडी, मंगरुळ, भराडी, बोरगाव बाजार, पळशी, डोंगरगाव, गोळेगाव, पानवडोद, अंधारी, म्हसला, उपळी, लोणवाडी, अजिंठा या परिसरात पावसाने कहर केला. दोन तास झालेल्या दमदार पावसामुळे शेतात पाणी साचले.
तर आधीच मनसोक्त वाहणाऱ्या नदी- नाल्यांना पूर आला. आमठाणा - तळणी रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकरी पुरता हताश झाला आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम वाढल्याने यंदा दिवाळी, भाऊबीजेलाही पाऊस पडला. त्यामुळे दिवाळी, भाऊबीज सणाच्या आंनदावर विरजण पडले. दिवाळीच्या आधीपासूनच पाऊस रमल्याने, याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. दिवाळीआधी बाजारपेठेत होणारी गर्दी फारशी दिसून आली नाही. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कापड दुकानदारांना बसला. तर इतर व्यवसायांवर देखील परिणाम झाला.
मदतीचा दिवा लागलाच नाही
सप्टेंबर महिन्यात तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल, अशी शाश्वती शासनाने दिली होती. मात्र दिवाळी झाली, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या घरात मदतीचा दिवा लागलेला नाही. उलट पुन्हा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीत भर पडली असून शेतकऱ्यांच्या नजरा शासकीय मदतीकडे लागल्या आहेत.
शासनाकडून अद्याप मदतीचा एक रुपयाही नाही
गंगापूर : रमाकांत बन्सोड
गंगापूर तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक भिजल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ऑक्टोबरअखेरीपासून असलेल्या सलग पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, तूर आदी पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस सतत सुरू असल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात असल्याची अवस्था निर्माण झाली आहे. अतिवृष्टी, अनुदानातील विलंब आणि आता परतीचा पाऊस या तिहेरी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अवकाळी पावसाने गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, कांदा, मका, तूर यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पूर्णपणे पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर आले आहेत. शासनाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण केल्याचे सांगितले असले तरी, अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला मदतीचा एक रुपयाही मिळालेला नाही.
दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या घरात ना उजेड, ना आनंद. अनेक शेतकऱ्यांना कुटुंबासाठी दिवाळीचा खर्च करणेही कठीण झाले आहे. पिकं गेली, मेहनत वाया गेली, आणि शासनाकडून दिलासा मिळत नाही; आमचं आयुष्यच कोरडं झालंय, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाने तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा पूर्ण करून नुकसानीचा अहवाल सप्टेंबरमध्ये शासनाकडे पाठवला आहे. मात्र, निधी वितरणाचा टप्पा कुठे अडकला आहे, याबाबत स्थानिक प्रशासनालादेखील स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करून प्रशासनाकडे आपला आक्रोश मांडला. पंचनामे करून अधिकारी गेले, पण आमच्या खात्यात अजून एक पैसाही जमा झाला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
गंगापूर तालुक्यात यंदा ९८ हजार हेक्टरवर खरिपातील पिकांची लागवड झाली होती. ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा अहवाल तालुका प्रशासनाने सादर केला आहे. तालुक्यातील ७८ हजार ५४० शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ६५ कोटी रुपयांची गरज असून याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.
नवनाथ वागवाड, तहसीलदार गंगापूर.
मका, सोयाबीन काढणीवर असताना पावसाने पुन्हा फटका दिला. महिनाभर मेहनत करून जे हातात आले होते तेही धोक्यात आलंय. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी.
भाऊसाहेब शेळके, शेतकरी नेते.
अतिवृष्टीचं अनुदान अजून मिळालेलं नाही. त्यात पुन्हा परतीचा पाऊस सुरू. कापूस भिजल्याने उत्पादनावर थेट परिणाम होतोय. विमा कंपनी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष द्यायला हवं.
संतोष साळुंके, शेतकरी
वरठाण : भावराव मोरे
वरठाणसह बनोटी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडासह जवळपास एक तास मुसळधार पाऊस झाला. नदी नाल्या वाहून निघाल्या दरम्यान या पावसामुळे वे चणीसाठी आलेला कापूस ओलाचिंब होऊन गेला असून पूर्णपणे वाया गेला असून त्यातच सोंगणी करून ठेवलेल्या मकाला कोंब फुटले आहेत. या दुहेरी नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
वरठाणसह वाडी, बनोटी, तिडका, बोरमाळतांडा गोदेंगाव, हनुमंतखेडा, किन्ही, शिदोंळ, पोहरी, पळाशी आदी परिसरात गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक जमिनी खरडून वाहून गेल्या तर अनेक जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने कपाशी, मका, पिके जवळपास सत्तर टक्के वाया गेली होती. थोड्याफार प्रमाणात कपाशी मका राहिलेला होता. ते पीक हातात येईल अशी आशा होती. पण ते पीकदेखील परतीच्या हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कपाशीची वेचणीसाठी आ-लेला कापूस अति पावसामुळे ओलाचिंब होऊन वाया गेला आहे. त्यातच मका सोंगणी करून ठेवला असून त्या मक्याला कोंब फुटले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात दररोज मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे.
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरा-वून घेतला. त्यामुळे राज्य सरकारने मदत जाहीर केली. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेलीअसून अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा न झाल्याने शेतकरी राज्य शासनाने कारभारावर रोष व्यक्त करीत आहेत.
बाबरा : फुलंब्री तालुक्यातील बाबरासह परिसरात रविवार, सोमवारी मंगळवार या तीन दिवसांत पावसाने बाबरासह परिसरात चांगले झोडपले, जोरदार पाऊस झाल्याने बाबरासह परिसरातील शेतकऱ्यांचे सोंगून झालेल्या मका पिकाचे मोठे नुकसान तर कपासाच्या वाती होत आहे त्यांमुळे शेतकऱ्यांनी दिवाळी, भाऊबीज सण एकदम साध्या पध्दतीने साजरे केले, ऐन दिवाळीच्या तोंडावर निर्सगाने शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चोहोबाजून आर्थिक संकटात अडकला आहे, सप्टेंबरपासून परिसरात पिकांच्या नुकसानीची मालिका सुरू आहे, सोमवारी, मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे वेचणीवर आलेल्या कापसाच्या जोरदार पावसामुळे वाती झाल्या तर कापणी केलेल्या मका पिकाचे नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी बाबरासह परिसरातील शेतकरी शेतमजूर करीत आहेत.