Bogus Call Center : रात्रीस खेळ चाले : बोगस कॉल सेंटरमधून दररोज कोट्यवधींची उलाढाल

आंतरराष्ट्रीय टोळीत अमेरिका, गुजरात, पश्चिम बंगालचे प्रमुख; नॉर्थ ईस्टच्या तरुण-तरुणींना विशेष प्रशिक्षण
Bogus Call Center : रात्रीस खेळ चाले : बोगस कॉल सेंटरमधून दररोज कोट्यवधींची उलाढाल
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : प्रमोद अडसुळे

आयआरएस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट नावाने अमेरिकेतील नागरिकांना टॅक्स चोरीची भीती घालून दररोज कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर एमआयडीसी सिडको पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री एक वाजेच्या सुमारास छापा मारला. कारवाईत ९२ पुरुष, २४ महिला असे एकूण ११६ जणांना बेड्या ठोकल्या. दररोज रात्रभर अमेरिकेतील लोकांना संपर्क करून कोट्यवधींचा गंडा घातला जायचा. नॉर्थ ईस्टच्या तरुण-तरुणींना स्पेशल अमेरिकन टोनमध्ये इंग्लिश बोलण्याचे प्रशिक्षण देऊन कामावर ठेवण्यात आले होते. शहर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

टोळीप्रमुख जॉन, भावेश प्रकाश चौधरी (३४, रा. अहमदाबाद), भाविक शिवदेव पटेल (२७, रा. मुंबई), सतीश शंकर लाडे (३५, रा. अहमदाबाद), वलय पराग व्यास (३३, रा. अहमदाबाद), अजय ठाकूर, मनोवर्धन चौधरी अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. फारुकी आणि जॉन फरार आहेत. अधिक माहितीनुसार, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना एमआयडीसी चिकलठाणा भागातील युनिव्हर्सल शाळेच्या समोर असलेल्या कनेक्ट इंटरप्राइजेस या इमारतीत आयआरएस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट नावाने बोगस कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली होती. छापा मारल्यानंतर तीन हॉलमध्ये शंभरहून अधिक तरुण तरुणी लॅपटॉप, संगणकावर, हेडफोन लावून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत असल्याचे रॅकेट उघडकीस आले.

Bogus Call Center : रात्रीस खेळ चाले : बोगस कॉल सेंटरमधून दररोज कोट्यवधींची उलाढाल
Illegal international call center : संभाजीनगरमधून अमेरिकन लोकांना कोट्यावधींचा गंडा

फसवणुकीची पद्धत चक्रावून टाकणारी

परदेशातील अमेरिका व नागरिकांची माहिती जॉन व फारुकी जमा करायचे. तो डेटा कॉल सेंटरमधील तरुण-तरुणींना दिला जायचा. त्यावर शंभराहून अधिकजण रात्रभर अमेरिकन लोकांना मोबाईलवर, ईमेल, अथवा एसएमएसद्वारे कर चुकविल्याचे बनावट मेसेज पाठवायचे. त्यात संपर्क क्रमांक दिला जायचा. नागरिक घाबरून कॉल करायचे. कॉल सेंटरवर कॉल येताच अगोदर एकजण तडजोड करण्यासाठी बोलणी करायचा. तेथून दुसऱ्या साथीदाराकडे कॉल ट्रान्स्फर करून क्लोजर त्याला अमेझॉन गिफ्ट कार्ड, ऍपल आयट्यून्स कार्ड, झेले, वेस्टर्न युनियन इत्यादी कार्ड विकत घेण्यास सांगून त्यावर नंबर कळविण्यास सांगायचं. नंबर मिळताच कार्डमधील पैसे डॉलर स्वरूपात जॉनकडे जायचे. तो डॉलरचे क्रिप्टो करंसीमध्ये रूपांतर करून फारुकीकडे ५५ टक्के रक्कम पाठवायचा. फारुकी त्याचे रुपयामध्ये रूपांतर करून हवाला मार्फत पैसे भारतात आणण्यासाठी यंत्रणा वापरायचा. चौधरी, पटेल, लाडे, व्यास, ठाकूर, मनोवर्धन हे कॉल सेंटरची यंत्रणा सांभाळत होते. यात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

डेटा पुरवणाऱ्यावर कारवाई व्हावी - अमेरिकन नागरिकांना फोन करून त्यांच्या संगणकात मालवेअर इंस्टॉल करणे, बनावट कायदेशीर नोटिसा पाठवून पैशाची मागणी करणे, सॉफ्टवेअर्स कमी किमतीत, मोफत, नवीन अपडेट्सच्या ऑफर्स देऊन फसवणूक करतात. अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळतात. व्हीपीएन, क्लोनिंग, बॉट्स, मालवेअर, फिशिंग यांसारख्या पद्धती वापरल्या जातात. या कॉल सेंटर्सला डेटा पुरविणाऱ्या साइट किंवा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. कॉल सेंटरवर काम करणाऱ्यानाही फसवणूक करत असल्याची पूर्ण कल्पना असल्याने त्यांच्यावरही कडक कारवाईची गरज आहे. असे अनेक कॉल सेंटर अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मयुर दिवटे, कंप्यूटर हॅकिंग फॉरेंसिक इन्वेस्टिगेटर (आयआयटी कानपूर)

अमेरिकेत दिवस, इकडे रात्र

नागालँड, सिक्कीम, आसाम, मणिपूर, कलकत्ता, मिझोरम या भागातून तरुण-तरुणींना २० ते २५ हजार रुपये पगार व प्रति डॉलर ३ रुपये कमिशन देऊन कामावर ठेवण्यात आले होते. यांच्या राहण्याची सोय पीजी भावेश याच्या घरात, मोंढा नाका भागात करण्यात आली होती. दररोज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तरुण-तरुणींना आलिशान वाहनांमधून कॉल सेंटरवर आणले जायचे. रात्रभर शंभराहून अधिक जण कोट्यवधींची फसवणूक करून सकाळी परत जायचे.

इमारतीच्या दोन मजल्यावर कॉल सेंटर

युनिव्हर्सल शाळेच्या समोर मुळे नामक व्यक्तीची इमारत असून त्यांच्याकडून आरोपी फारुकी याने सुमारे वर्षभरापूर्वी ५७ पानांचा करारनामा करून दोन मजले भाड्याने घेतले होते.

तब्बल २२ तासांहून अधिकवेळ चालली कारवाई

एमआयडीसी सिडको ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने रात्री एकच्या सुमारास छापा मारला. त्यानंतर तत्कळ उपायुक्त रत्नाकर नवले, प्रशांत स्वामी, पंकज अतुलकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे फौजफाटा घेऊन दाखल झाले. व्यापक कारवाई असल्याने अन्य ठाण्याचे निरीक्षक बोलविण्यात आले. तब्बल १५० ते २०० पोलिस कारवाईत सहभागी होते. ही कारवाई तब्बल २२ तासांहून अधिक वेळ चालली. सायंकाळी पाचच्या सुमारास प्रभारी पोलिस आयुक्त सुधीर हिरेमट यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news