Sambhajinagar News : 'त्या' गावातील दोन हजार, बालकांची आरोग्य तपासणी
Health check-up of two thousand children from 'that' village
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: फुलंब्री तालुक्यातील खंमाटवस्ती पाथ्री येथे अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आलेली तीन बालके आढळल्याने हादरलेल्या आरोग्य यंत्रणेने तातडीने सर्वेक्षण सुरू केले. मागील चार दिवसांत घरोघरी जाऊन सुमारे दोन हजार बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यात एकही एएफपी संशयित न आढळल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. चार दिवसांपूर्वी खंमाटवस्ती पाश्री गावातील ३० महिन्यांचा बालक, नऊ वर्षाचा तर तिसरा ११ वर्षाचा मुलगा या तिघांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आल्याने उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, एकाच गावातील तीन बालके अचानक अशक्तपणा आणि लुळेपणाची आढळल्याने हादरलेल्या आरोग्य विभागाकडून घर-ोघरी सर्वेक्षण करत० ते ५ वर्ष, ६ते १५ वर्ष आणि १५वर्षापुढील एकूण १,९८७ जणांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोत बंद करुन ग्रामपंचायतीकडून लोकांना शुद्ध व निर्जंतुक केलेले पाणी पुरवले जात आहे.
दोन मुले लागली चालायला
शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तिघांपैकी दोन्ही मुलांच्या पायात पुन्हा शक्ती येऊन ते चालायला लागले आहेत. तर तिसऱ्या अडीच वर्षाच्या मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

