

Approval for three insurance policies of Shirdi Sansthan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तीन विमा पॉलिसी नूतनीकरणास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली आहे.
या प्रकरणी खंडपीठात संस्थानचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अॅडहॉक कमिटीच्या वतीने दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला होता. यात नमूद केल्यानुसार संस्थानच्या वतीने संस्थानची मालमत्ता आणि त्याचे कर्मचारी, संस्थानतर्फे चालविण्यात येणारी हॉस्पिटलची मालमत्ता आणि कर्मचारी तसेच संस्थानमध्ये येणारे भाविक यांचा अशा तीन पॉलिसी काढण्यात येतात.
गतवर्षी खंडपीठाच्या परवानगीने काढण्यात आलेल्या याच तीनपैकी पहिल्या दोन विमा पॉलिसीची मुदत अनुक्रमे ९ जुलै आणि १० जुलै २०२५ रोजी संपली असून भक्तांसाठीच्या पॉलिसीची मुदत ११ ऑगस्टपर्यंत आहे. या तिन्ही पॉलिसीसाठी एकत्रित अंदाजे एक कोटी तीन रुपये लाख रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे. या खर्चास मान्यता देण्याची विनंती अर्जात करण्यात आली होती.
झालेल्या सुनावणीत संस्थानच्या वतीने अॅड. अनिल बजाज यांनी सांगितले की, संस्थान मालमत्ता आणि कर्मचारी तसेच हॉस्पिटल मालमत्ता आणि कर्मचारी यांच्यासाठीच्या पॉलिसीची मुदत आधीच संपली असल्याने अॅडहॉक कमिटीने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे.
त्यास मान्यता तसेच भक्तांसाठीच्या विमा पॉलिसीला परवानगी देण्यात यावी. यावर खंडपीठाने तिन्ही पॉलिसींना मान्यता दिली. यापुढे अॅडहॉक कमिटीने विमा पॉलिसीची मुदत संपण्याआधीच खंडपीठाची परवानगी घ्यावी. प्रकरणात संस्थान समितीच्या वतीने अॅड. अनिल बजाज यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. राम मालानी, अॅड. प्रणित पाटणी आणि अॅड. खिंवसरा यांनी साह्य केले.