

Head-on collision between a tempo and a container truck; one killed, 20 injured
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो व कंटेनरची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात १ ठार, तर २० जण जखमी झाले. यातील तीन जण गंभीर आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.४) दुपारी तीन वाजता वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील घायगाव पाटी शिवारात घडला.
ज्ञानेश्वर रूपचंद वाघ (२०, रा. पाटेगाव, ता. पैठण) असे अपघातातील मृताचे नाव आहे. गणेश रामचंद्र जाधव (३७), अजय बाजीराव वाघ (१८), विशाल जाधव (१८), किसन वामन वाघ (२०), रणजीत गुलाब वाघ (२५), जयसिंग रतन वाघ (२२), राम कल्याण वाघ (२०), जितेंद्र वाघ (१९), शालिनी किरण सोनवणे (३५), सिध्दू वाघ (१९), आदिनाथ वाघ (२०), कैलास वाघ (२०), चेतन वाघ (२५), सुनील वाघ (३०), संतोष वाघ (२०), अजय सोनवणे (२०), अनिता वामन वाघ (३५), सोन्या वाघ (२०) अन्य दोन जणांची नावे कळाली नाही, असे २० जण अपघातात जखमी झाले. जखमींवर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) हलवण्यात आले आहे.
पाटेगाव (ता. पैठण) येथील काशिनाथ रामचंद्र ठाकरे यांच्या मुलाचे लग्न येवला तालुक्यातील गोपाळवाडी येथील शिवाजी वाघ यांच्या मुलीशी शुक्रवारी (दि.५) होते. या विवाहासाठी टेम्पोमधून वऱ्हाडी येवला येथे जात होते. वैजापूर तालुक्यातील घायगाव पाटी शिवारात वऱ्हाडाचा टेम्पो (एम एच २०ई जी ०१५८) आला असता याचवेळी वैजापूरहून गंगापूरकडे जाणारा कंटेनर (जी जे २७ टी एफ ५५३५) यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात २१ जखमी झाले. यावेळी टेम्पोमध्ये एकूण २५ जण होते.
अपघात घडल्याची महिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य करून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले. जखमींची संख्या मोठी असल्याने शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीला शहरातील खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचारासाठी सहाय्य केले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना तीन ते चार रुग्णवाहिकांतून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले.
सर्व जखमी थेट घाटीत; वैजापूर उपजिल्हा रुग्णालय कशासाठी ?
अपघातातील जखमींपैकी काहींना किरकोळ दुखापती होत्या. तरीही सर्वच जणांना थेट घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात अपघातग्रस्तांवर उपचार होत नसतील तर येथील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.