

छत्रपती संभाजीनगर : शहरातील राशीदपुरा भागात पैशाच्या लालसेपोटी मानवतेला काळीमा फासणारा संतापजनक अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला आहे. अवघे बारावी पास असलेल्या एका महिलेने चक्क घरातच बेकायदेशीर गर्भपाताचे ऑपरेशन थिएटर थाटले होते. विशेष म्हणजे, पोटात मुलगा असला तरी पालकांना मुलगी असल्याचे खोटे सांगून त्यांच्याकडून गर्भपात करवून घेण्याचा गोरखधंदा या रॅकेटद्वारे चालवला जात होता. गुन्हे शाखा आणि मनपाच्या आरोग्य विभागाने सोमवारी (दि. २७) रात्री छापा मारून या रॅकेटचा पर्दाफाश केला.
याप्रकरणी मुख्य सूत्रधार शाहेदा परवीन सय्यद इर्शाद अहमद (५१), तिचा पती सय्यद इर्शाद अहमद सय्यद गणी (६१, दोघे रा. राशीदपुरा), मदतनीस नसरीन नजीर शेख (४७, रा. आझाद चौक) आणि मीनाक्षी मंगेश थोरात (३५, रा. सिनाई समर्थ रेसिडेन्सी, जटवाडा रोड) या चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर गर्भलिंग निदान करणारा लॅब चालक मंगेश सुखदेव थोरात आणि सुरेखा बबन हिरडे (४०) हे फरार आहेत.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अर्जुन कदम, दिनेश बन, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, राजेंद्र साळुंके, मनोज अकोले, दामिनी पथकाच्या कांचन मिरथे, निर्मला निंभोरे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ. राठोडकर, डॉ. सुनील पाटील, गवासउद्दीन, संजय शिरोडकर, प्रवीण रांजणगावकर यांच्या पथकाने घरावर छापा मारला.
पाकीजा फंक्शन हॉलमागे असलेल्या कमर व्हिला अपार्टमेंटमध्ये छापा मारला. यावेळी एका महिलेचा गर्भपात सुरू होता.रक्तस्राव वाढल्याने प्रकृती खालावलेल्या या महिलेला पहाटे साडेतीन वाजता तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नाल्याशेजारी फ्लॅट; कुत्रे तोडायचे लचके
या रॅकेटची क्रूरता मन सुन करणारी आहे. शाहेदाने एका निवृत्त न्यायाधीशाचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. गर्भपातानंतर कावलेला मृत गर्भ ती थेट अपार्टमेंटच्या मागे असलेल्या भल्यामोठ्या नाल्यात फेकून द्यायची. गर्भ लहान असेल तर चक्क कुर्त्यांसमोर टाकायची, पोलिसांनी छापा टाकला तेव्हा या घरासमोर तब्बल १७-१८ भटके कुत्रे मांसाच्या आशेने बसून असल्याचे संतापजनक चित्र समोर आले.
यंत्रणा झोपेत; दोन महिन्यांत तिसरे रॅकेट
उच्चभ् वसाहतीत राहणारी आणि मुले परदेशात चांगल्या नोकरीवर असतानाही शाहेदाने हा मृत्यूचा बाजार मांडला होता. या किटमध्ये लाखोंचे व्यवहार आणि अनेक एजेंट कार्यरत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत सातारा आणि पिसादेवीपाठोपाठ शहरात उघडकीस आलेले हे तिसरे मोठे रॅकेट आहे. तरीही मनपाच्या आरोग्य विभागाला आणि औषध प्रशासनाला याची साधी भनकही लागू नये, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. गर्भपाताची औषधी पुरवणारे माफिया कोण, याचाही शोध अद्याप लागलेला नाही.
मुलगा असला तरी सांगायचे मुलगी !
फरार आरोपी मंगेश थोरात आणि त्याची पत्नी मीनाक्षी हे सिडको एन-६ आणि पळशी येथील लॅबमध्ये येणाऱ्या महिलांचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करायचे, तसेच घरी जाऊन पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करायचे. पोटात मुलगा असला तरी पैशाच्या लालसेपोटी ते मुलगी असल्याचे खोटे सांगायचे आणि गर्भपातासाठी ४० ते ५० हजार रुपये उकळून महिलांना शाहेदाकडे पाठवायचे. शाहेदा यासाठी १० ते १५ हजार रुपये घ्यायची.
घरातच थाटले होते ऑपरेशन थिएटर
कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेली शाहेदा काही वर्षे एका बालरोगतज्ज्ञाकडे कामाला होती. त्या अनुभवावर तिने घरातच सर्जिकल टेबल, कॉट आणि वैद्यकीय उपकरणांसह चक्क ऑपरेशन थिएटर थाटले होते. घरातून प्रतिबंधित गर्भपाताच्या गोळ्या, योनीमार्ग उघडण्याची अवजारे, इंजेक्शन आणि पोर्टेबल प्रोब जप्त करण्यात आले आहे.