Gutkha Seized : सातारा परिसरात पोलिसाच्या घरातून ३६ लाखांचा गुटखा जप्त
Gutkha worth 36 lakhs seized from police house in Satara area
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सातारा पोलिस ठाण्यात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात साठवून ठेवलेला ३६ लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी बुधवारी (दि.२६) छापा मारून जप्त केला. त्या पोलिस कर्मचाऱ्याने भाड्याने घर दिलेले असून, ताबीश खान झियाउद्दीन खान (३३, रा. जालाननगर) असे अटकेतील साठेबाजाचे नाव आहे.
परिसरातील सातारा मार्तंडनगरात एका घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसल्याचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. तीन खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखू साठवलेला आढळून आला.
हा सर्व साठा स्वतःचाच असल्याचे ताबीशने सांगितले. त्यात गोवा १ हजार गुटखा, गोवा पानमसाला, जी १ जर्दा, राजनिवास पानमसाला, जाफरानी जर्दा, रजनीगंधा, आरएमडी, सेन्टेड तंबाखू, हिरा पानमसाला, इत्यादी विविध ब्रँडच्या सुमारे ३६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा व पानमसाला होता. या गुटखा विक्रीसाठी ताबीशने चक्क घरच किरायाने घेतले असल्याचे समोर आले. ताबीशवर यापूर्वीही जिन्सी भागात गुटखा विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांच्या तक्रारींवरून सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
'तो' पोलिस कर्मचारी सातारा भागातच वास्तव्यास
आरोपी ताबीशला ज्या पोलिस कर्मचाऱ्याने घर भाड्याने दिले आहे, तो कर्मचारी सातारा परिसरातच वास्तव्यास असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे शहरभरात याच घरातून गुटखा पोहोच केला जात असल्याचेही समोर आले. त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला भाड्याने दिलेल्या घरात काय चालले हे माहिती नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

