

High Security Number Plate: Countdown begins
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. याची मुदत ३० नॉव्हेंबर रोजी संपत आहे. मुदतीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, गुरुवारी (दि. २७) सायंकाळपर्यंत मुदतवाढीचे निर्णय न आल्याने वाहनधारकांच्या हाती केवळ २ दिवस उरले आहेत.
अद्यापही जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ४७ हजार ३३३ वाहनधारकांनी या नंबर प्लेटसाठी नोंदणीही केलेली नाही. दरम्यान, यात मुदतवाढीसाठी शुक्रवार (दि.२८) च्या रात्रीपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली. २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी) बसवून घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
आजपर्यंत सुमारे ३ लाख ५२ हजार ६६७वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख ९६ हजार ९५४ वाहनांना या नंबर प्लेट बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०१९ पूर्वीची सुमारे ७ लाख वाहने आहेत. आजही सुमारे ३ लाख ५२ हजार ३३३ वाहनध-ारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली नाही. उरलेल्या २ दिवसांत या सर्व वाहनधारकांना नोंदणी करणे आवश्यक आहे अन्यथा आरटीओच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मुदतवाढीची अपेक्षा
नंबर प्लेटसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीचे जिल्ह्यात सुमारे ५० पेक्षाही जास्त ठिकाणांहून नंबर प्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. तरीही वाहनांची संख्या जास्त असल्याने ही मुतदवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२५ त्यानंतर ३० जून २०२५ तसेच १५ ऑगस्ट २०२५, तर त्यानंतर ३० नोव्हेंबर अशी चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा वाहनधारकांना असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी याबाबत निर्णय आला नसल्याची माहिती आरटीओच्या वतीने देण्यात आली.
...तर कारवाई
हायसिक्युरीटी नंबर प्लेटसाठी ३० नोव्हेंबर ही मुदतवाढ दिली आहे, ही मुदतवाढ चौथी आहे. त्यानंतर मात्र मुदतवाढ न मिळाल्यास १ डिसेंबरपासून आरटीओच्या वायुवेग पथकांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरटीओच्या वतीने देण्यात आला आहे.