Sillod News : मिरचीचा ठसका ओसरला, बाजारपेठेत भाव घसरला
Green chilli prices fall in the market
राजू वैष्णव
सिल्लोड : तालुक्यात शिवना, गोळेगाव, आमठाणा, दीडगाव फाटा आदी ठिकाणी हिरवी मिरची खरेदी केली जाते. यात शिवणा मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत भाव घसरल्याने हिरव्या मिरचीचा ठसका ओसरला आहे. भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च पदरी पडण्याची आशा धूसर झाली आहे.
तालुक्यात यंदा ५ हजार ९८९ हेक्टरवर उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आलेली आहे. यासाठी रोप, ठिंबक, मल्चिंग, खते, औषधी असा मोठा खर्च मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केला. आधी मिरचीला चांगला भाव मिळाला. मात्र आवक वाढताच भाव घसरले.
तालुक्यात बळीराम, ज्वेलरी, शिमला, पिकाडोर, शार्क वन, तलवार, तेजा फोर, आरमार, इगल अशा वानांची लागवड केली जाते. यातील रोपांमध्येही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार तालुक्यात समोर आलेला आहे.
मिरचीला सुरुवातीला प्रतिकिलो पन्नास- साठ रुपयांचा भाव मिळाला. बाजारपेठेत आवक वाढताच भाव पंधरा वीस रुपयांवर आला आहे. तालुक्यात मिरचीच्या खरेदी- विक्रीतून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.
तर तालुक्यातील मिरची दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेशसह बांगलादेशात निर्यात केली जाते, मिरची बाजारात येताच परराज्यातील व्यापारी तालुक्यात ठाण मांडून बसतात. तर मिरची तोडणीतून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो.

