

Information about fertilizers will now be available on the blog
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कृषी केंद्रांवर खतांचा साठा असतानाही चढ्या भावाने खतांच्या विक्रीसाठी अनेक केंद्रचालक खते नसल्याचे शेतकऱ्यांना सांगतात. हे प्रकार टाळण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना खतांच्या उपलब्धतेची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर तालुकानिहाय प्रत्येक कृषी केंद्रावरील उपलब्ध खतांची माहिती देण्यात आली आहे. आपल्या मोबाईलवरून शेतकऱ्यांना ही माहिती सहज पाहता येणार आहे.
शेतकऱ्यांना विनामूल्य ही माहिती उपलब्ध होणार असल्याने खतांचा काळाबाजार, लिकिंग सारख्या अपप्रवृत्तींना आळा बसेल व शेतकऱ्यांना लाभ होईल, असा विश्वास बुधवारी (दि. २५) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला.
अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर या उपक्रमात वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांना केल्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा घेतला. त्यावेळी कृषी विभागाने खतांच्या उपलब्धतेची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्याचे निर्देश दिल्याचे समोर आले.