

गंगापूर : तालुक्यातील सोलेगाव येथे एका ३८ वर्षीय परित्यक्ता महिलेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तीन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २४ जानेवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असताना ही घटना घडली. शेजारी राहणारा संशयित आरोपी संदीप अशोक खरे याने पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला आणि घराबाहेर धाव घेतली.
महिलेने प्रतिकार केल्यानंतर संदीप खरे याच्यासह त्याचे दोन भाऊ अजय अशोक खरे आणि सुनील अशोक खरे यांनी पीडितेला गाठून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. 'जर या घटनेची तक्रार केली तर जीवे मारू' अशी धमकीही या तिघांनी पीडितेला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ गंगापूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ आणि ७५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.