Chain Snatching : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेची सोनसाखळी ओरबाडली

दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत बेड्या, एक फरार; पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई
Chain Snatching
Chain SnatchingPudhari
Published on
Updated on

Gold Chain Snatched from Woman on Morning Walk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका ५८ वर्षीय महिलेला भररस्त्यात अडवून, चाकूचा धाक दाखवत, मारहाण करत गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी (दि.२०) सकाळी पावणेसहाच्या सुमारास कारगिल मैदान परिसरात घडली. या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अवघ्या २४ तासांत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. तर त्यांचा एक साथीदार अद्याप पसार आहे.

Chain Snatching
Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

अमन महेबूब शेख (२१, रा. नवनाथनगर, गारखेडा) आणि आदित्य अनिल कोळे (१९, रा. भारतनगर, गारखेडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शेख अल्ताफ शेख मुबारक हा फरार झाला आहे.

फिर्यादी सुलभा शिवाजी सोमवंशी (५८, रा. नाथप्रांगण, गारखेडा परिसर) या २० मे रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या दुचाकीवरून तीन तरुण आले. दुचाकीजवळ थांबवून एकाने खाली उतरत त्यांना ताई अशी हाक मारली. सुलभा यांनी मागे वळून पाहताच, त्या भामट्याने थेट त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर झडप घातली. त्यांनी प्रतिकार केल्याने झालेल्या झटापटीत त्या खाली पडल्या. त्याचवेळी लुटारूने चाकू काढून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून तिघांनीही दुचाकीवरून पोबारा केला.

Chain Snatching
Mangalsutra snatched : सलग दोन दिवसांत दोन वृद्ध महिलांचे मंगळसूत्र ओरबाडले; मुकुंदवाडी, चिकलठाणा हद्दीत घटना

दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार

अटक केलेला आरोपी अमन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी आणि मोबाईल चोरीचे ४ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. आदित्य कोळेचा हा दुसरा गुन्हा आहे. तसेच फरार असलेला अल्ताफ शेख हादेखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या टोळीकडून शहरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरून लावला छडा

घटनेनंतर घाबरलेल्या सुलभा यांनी तात्काळ ११२ वर संपर्क साधून पोलिसांना मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा झटापटीत तुटलेले मंगळसूत्राचे पेंडल तिथेच सापडले पण चेन लुटारूंच्या हाती लागली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद भालेराव, अंमलदार अंकुश वाघ, मदन गोरे आणि अमोल आहेर यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत अमन आणि आदित्यला २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. या दोघांनाही न्यायालयाने २५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news