Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

लाखो रुपयांचा ऐवज लंपास
robbery case
robbery casePudhari
Published on
Updated on

Sambhajinagar City overrun by petty thieves; Four incidents of burglary and robbery

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पोलिसांचा धाक ओसरल्याचे चित्र आहे. दुकान फोडणे, घरफोडी आणि रस्त्यावरील लुटमारीच्या तब्बल चार घटना शनिवारी (दि. २) उघडकीस आल्या आहेत. एमआयडीसी सिडको, जवाहरनगर, जिन्सी आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटना क्र १ : भरदिवसा घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

फिर्यादी ऋषिकेश राजाभाऊ सुतार (२१, रा. शिक्षक कॉलनी, केंब्रिज शाळेच्या पाटीमागे) याच्या तक्रारीनुसार, त्याच्या घरात शिरून चोरट्याने कपाटातील ४ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर, ४ ग्रॅमचे डोरले, १ लाख ३४ हजाराची रोकड असा १.७८ लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी (दि.१) दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना क्र २ : मोंढा नाका भागात दुकान फोडले

फिर्यादी दर्शन भगवानदास तोलवानी (४८, रा. सिंधी कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे मोंढा नाका भागात दर्शन हार्डवेअर अँड टूल्स नावाने दुकान आहे. शुक्रवारी (दि.१) मध्यरात्री चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. दुकानातून वेल्डिंग केबल, नट बोल्ट, कनेक्टर, तांब्याचे कॉइल, ग्रॅण्डर, ड्रिल मशीन यासह अन्य ७५ हजाराचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना क्र ३ : घरात घुसून गळ्यातील पोत हिसकावली

फिर्यादी कमलाबाई रामलाल जाधव (६५, रा. रोहिदासपुरा, जुना मोंढा) यांच्या तक्रारीनुसार, त्या शनिवारी (दि. २) मध्यरात्री अडीचच्या सुमारास घराच्या हॉल मध्ये झोपलेल्या असताना चोरट्याने पाठीमागील भिंतीवरून उडी घेऊन आत प्रवेश केला. कमलाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि ८ हजाराची रोकड असा ऐवज चोरून पसार झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना क्र ४ : दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावला

फिर्यादी पठाण मुजफ्फर खान अब्दुल गफार खान (५८, रा. गादिया विहार) हे कृषी कार्यालयासमोरून रात्री साडेबाराच्या सुमारास रत्स्याने पायी जात असताना शाहनूरमिया दर्गा चौकाकडून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील १२ हजाराचा मोबाईल हिसकावून धूम ठोकली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदिवसा जाफर गेटजवळ व्यापाऱ्याला लुटणारा गजाआड

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दुचाकीला धक्का देऊन खाली पाडून व्यापाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी भरदिवसा हिसकावून पळ काढलेल्या लुटारूला क्रांती चौक पोलिसांनी गजाआड केले आहे. अजरोद्दीन कलीम काझी (३६, रा. संजयनगर, बायजीपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ४ ग्रॅमचा सोनसाखळीचा तुकडा जप्त केला आहे.

फिर्यादी राजेश रुपचंद रेड्डी (४५, रा. पदमपुरा) हे २६ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास जाफर गेट भागात खरेदीसाठी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला आरोपीने जाणीवपूर्वक धक्का देऊन पाडले. रेड्डी खाली पडताच त्यांचा गळा पकडून तो सोन्याची १५ ग्रॅमची सोनसाखळी ओढू लागला. मात्र, रेड्डी यांनी साखळी घट्ट पकडून ठेवल्याने लुटारूच्या हाती केवळ ४ ग्रॅमचा तुकडा लागला. गुन्हा दाखल होताच क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक सुनील माने, विशेष पथकातील उपनिरीक्षक अशोक इंगोले, हवालदार संतोष मुदिराज, माजिद पटेल, इरफान, चव्हाण, खरात आणि लोखंडे यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तब्बल ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून व अन्य पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी काझीच्या मुसक्या आवळल्या.

मुद्दाम लंगडत गेला

रेड्डी यांच्या गळ्यात साखळी पाहताच काझीने त्यांचा पिच्छा पुरवला. त्यांना दुचाकीवरून खाली पाडल्यानंतर त्यांच्याशी जाणीवपूर्वक हुज्जत घातली. गळा पकडून साखळी हिसकल्यानंतर स्वतःलाच मार लागल्याचा बहाणा करत तो लंगडत तेथून पसार झाला होता. मात्र, पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून तो सुटू शकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news